Coronavirus: मच्छीमार आणि शेतकऱ्यांना वर्षभर बॅटरी सर्व्हिस मोफत; इंजिनिअर विद्यार्थ्याचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 12:16 AM2020-05-04T00:16:06+5:302020-05-04T00:16:18+5:30
बोर्डीनजीकच्या पंचक्रोशीत शेती तसेच मासेमारी हा स्थानिकांचा प्रमुख व्यवसाय आहे.
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : मासेमारी बोटी आणि ट्रॅक्टर यांच्या बॅटरीचे सर्व्हिसिंग तसेच चार्जिंग वर्षभर मोफत करून देण्याचा निर्णय बोर्डीतील मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने घेतला आहे. बोर्डी आणि झाई येथील मच्छीमार आणि शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. ही सेवा सुरू करण्याची परवानगी डहाणू तहसीलदारांनी दिली आहे.
बोर्डीनजीकच्या पंचक्रोशीत शेती तसेच मासेमारी हा स्थानिकांचा प्रमुख व्यवसाय आहे. कोरोनामुळे मासेमारी ठप्प असून शेतीमालाची निर्यात थांबल्याने या व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाकडूनही सबसिडी, विशेष पॅकेज मिळण्याची शक्यता धूसर आहे. हे लक्षात घेऊनच येथील भूमिपुत्रांना मासेमारी बोट आणि ट्रॅक्टर यांच्या बॅटरीची वर्षभर फ्री सर्व्हिस तसेच चार्जिंग करून त्यांच्या व्यवसायाला मदतीचा हात देण्याचा विचार बोर्डी येथील गावदेवी परिसरात राहणाºया स्मित विवेक सावे याने कुटुंबीयांना बोलून दाखवला. तो मॅकेनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असून पार्टटाईम बॅटरी सर्व्हिसिंगचे दुकान चालवितो. त्याच्या या विचाराला कुटुंबीयांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याने २७ एप्रिल रोजी डहाणू तहसीलदारांकडे लेखी अर्ज देत परवानगी देण्याची विनंती केली होती. मासेमारी आणि शेती व्यवसायाशी संबंधित दुकानांना योग्य नियमांची अंमलबजावणी करून परवानगी असल्याने ती तत्काळ मान्यही झाली. त्यामुळे बोर्डी, झाई आणि परिसरातील शेतकºयांना पुढील वर्षभर मासेमारी बोटीच्या तसेच शेती मशागतीला लागणाºया ट्रॅक्टरच्या बॅटरीची फ्री सर्व्हिस आणि चार्जिंग उपलब्ध होणार आहे. यामुळे मच्छीमार आणि शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. सामाजिक भान म्हणून या युवकाच्या निर्णयाबद्दल त्याचे कौतुक होत आहे.