Coronavirus: हृदयद्रावक! जन्मताच कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 11:54 AM2021-06-06T11:54:21+5:302021-06-06T11:55:11+5:30
Coronavirus in Maharashtra: गेले सहा दिवस हे बाळ मरणाशी झुंज देत होते. मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे. शनिवारी सकाळी पाचच्या सुमारास या नवजात बालकाचा मृत्यू झाला.
- हुसेन मेमन
जव्हार - लहान बालकांसाठी पालघर जिल्ह्यात आरोग्य सुविधा नसल्याने करोना लागण झालेल्या व उपचारासाठी वणवण फरफट केलेल्या पालघरमधील नवजात बाळाचा नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान करुण अंत झाला. गेले सहा दिवस हे बाळ मरणाशी झुंज देत होते. मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे. शनिवारी सकाळी पाचच्या सुमारास या नवजात बालकाचा मृत्यू झाला.
प्रथम त्याला पालघरहून जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्याच्यावर 24 तास उपचार सुरू होता, मात्र मुदतपूर्व प्रसूती, बाळाचे वजन कमी त्यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याने दिवसेंदिवस बाळाची प्रकृती खालावत गेली, त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पालघर तालुक्यातील सफाळे दारशेत येथील राहणाऱ्या अश्विनी काटेला यांनी सहा दिवसांपूर्वी पालघर शहरातील एका खाजगी दवाखान्यात नवजात बाळाला जन्म दिला. मुदतपूर्व प्रसूती झाल्याने बाळाचे वजन कमी होते म्हणून त्याला पालघरच्या एका दुसऱ्या दवाखान्यात उपचारासाठी हलविले गेले. तेथे बाळाची अँटीजन टेस्ट केल्यानंतर बाळ पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.
मात्र मातेची टेस्ट निगेटिव्ह आली होती. बाळाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला पालघर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथे बालकांसाठी सुविधा नसल्याने तसेच करोना लागण झालेल्या बालकांसाठी जिल्हा प्रशासनाने कोणतीही आरोग्य सुविधा उभारली नसल्याने बाळाला उपचारासाठी फरफट करावी लागली.
उपचार सुरू असताना अखेर शनिवारी पहाटे 5 च्या दरम्यान बाळाने शेवटचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. या नवजात बाळाला 6 दिवसाच्या जीवन मरणाच्या झुंजात उपचारअभावी अखेर हार पतकारावी लागली हेही तितकेच खर आहे.