Coronavirus : लॉकडाऊनचा मालवाहतूकदारांना फटका, ट्रक चालकांनी गाडीमध्येच मांडली चूल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 04:42 PM2020-03-31T16:42:38+5:302020-03-31T16:56:12+5:30
Coronavirus : देशात लॉकडाऊन झाल्यावर महामार्गावरून विविध राज्यातील प्रवास करणारे ट्रक व त्यांची वाहतूक महामार्ग पोलिसांनी 'जैसे थे"थांबवली
वसई - देशभरात वाहतुकीचे लहान-मोठे ट्रक विविध ठिकाणी लॉकडाऊनच्या आदेशामुळे राष्ट्रीय महामार्गावर "जैसे थे" स्थितीत उभे आहेत. महामार्गावर आजूबाजूला कुठल्याही प्रकारची खाण्यापिण्याची सोय नसल्याने आज हजारो ट्रकचालक व क्लिनरचे मात्र हाल सुरू असल्याचे चित्र सध्या वसईच्या मुंबई-अहमदाबाद स्थित चिंचोटी महामार्गावर आढळून आले आहे. विशेष म्हणजे आता या उभ्या असलेल्या वाहतूक ट्रक चालकांनी आपलं सामान ट्रकमधील मागील बाजूस गाडीत ठेवलं असून तिथे आपली जेवणाची चूल देखील मांडली आहे.
देशात लॉकडाऊन झाल्यावर महामार्गावरून विविध राज्यातील प्रवास करणारे ट्रक व त्यांची वाहतूक महामार्ग पोलिसांनी 'जैसे थे"थांबवली आणि या सर्वांनी मिळेल त्या ठिकाणी आपले मालवाहतूक ट्रक रस्त्याच्या कडेला किंवा खुल्या जागेवर व बहुतांश पेट्रोल पंप ठिकाणी उभे केले.परिणामी लॉकडाऊननंतर ट्रक उभे करून आठ दिवस झाले आहेत. सर्वत्र महामार्ग असल्याने जवळ काहीच मिळत नाही. आजूबाजूची दुकानं, हॉटेल व इतर अत्यावश्यक बाबी ही बंद असल्याने ट्रक चालकांच्या खाण्यापिण्याचे हाल झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे
ट्रक चालकांकडचे पैसे ही संपले असल्याने काहींचे तर जेवणाचे देखील हाल झाले आहेत. तर काहींनी ज्यांच्या जवळ ट्रकमध्ये स्टो व भांडी आहेत त्यांनी रेशन आणून गाडीतच चूल मांडून तिथे आपला संसार थाटला आहे. याउलट ज्यांच्याकडे काहीच नाही त्या ट्रक चालकांना आजूबाजूला असणाऱ्या गावातून जेवण, नाश्ता व पाणी पुरवत आहे. तर काहींजवळ असलेल्या मोबाईलला चार्जिंग नसल्याने किंवा जवळ पैसे नसल्याने दूरवर असलेल्या घरच्यांना फोन ही करू शकत नाही.
बाहेर पडले तर पोलीस मारतात तर पूर्ण दिवस गाडीत बसून व थोडे फार ट्रक भोवती फिरून हे सामान्य ट्रक चालक आज कधी उपाशी पोटी तर मिळाले तर मिळाले जेवण असे काहीसे दिवस काढत आहेत. या संदर्भात बबली गुप्ता यांनी सांगितले, की आज आमच्याकडे पैसे नाही, पुढचे अनेक दिवस काढायचे आहेत. बिहारला पोचायचं आहे आम्ही यातून काय मार्ग काढणार अशी आर्त हाक मारत या वाहनचालकांनी त्यांची व्यथा मांडली.
सरकारने ट्रक चालकांना मदत केली पाहिजे !
नेहमीच सरकारला योग्य सहकार्य करा, दिलेल्या सर्व आदेशाचे पालन करा वाहतूक एकजूट अशीच ठेवा, असे संघटनेकडून सांगितले जाते. त्यामुळे वाहतूकदार हा देशाचा कणा आहे त्यामुळे आलेल्या कोरोना संकटाचा ते अशा प्रकारे सामना करत आहेत त्यामुळे सरकारने ही त्यांची योग्य काळजी घ्यावी.