coronavirus: मुंबई वाढवतेय वसईतील कोरोनाचा रुग्णांचा आकडा? बहुसंख्य रुग्णांचे मुंबई कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 02:57 AM2020-05-11T02:57:34+5:302020-05-11T03:00:13+5:30
वसई-विरारमध्ये सापडलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबईमध्ये कामावर जाणारे असून त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने सध्या या भागातील अनेक कुटुंबे कोरोनाबाधित ठरलेली आहेत.
- प्रतीक ठाकूर
विरार : वसई-विरारचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २०० हून जास्त झाला आहे. मात्र, हा आकडा मुंबईत दररोज कामावर जाणाऱ्या लोकांमुळे वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे. वसई-विरारमध्ये सापडलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबईमध्ये कामावर जाणारे असून त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने सध्या या भागातील अनेक कुटुंबे कोरोनाबाधित ठरलेली आहेत. त्यामुळे रोज मुंबईला कामावर जाणाºया लोकांची मुंबईतच राहण्याची सोय करण्याची मागणी होत आहे.
वसई तालुक्यात लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन होत आहे, पण असे असतानाही बाधित रुग्णांचा आकडा वाढत असून याचे कारण मुंबईला कामावर जाणाºया व्यक्ती अथवा त्यांच्या संपर्कात येणाºया लोकांची संख्या लक्षणीय आहे.
वसई-विरारच्या शहर आणि ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईतील वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करीत आहेत, तर अत्यावश्यक सेवेत मोडणाºया क्षेत्रात काम करीत असल्यामुळे अनेक जणांना रोज मुंबईला कामाला कामावर जावे लागते. बँक, हॉटेल, रुग्णालय, बेस्ट, पोलीस दल आणि इतर शासकीय कर्मचारी यांचा यात समावेश असून रोज हे लोक मुंबईला ये-जा करतात.
पण, सध्या मुंबई ही कोरोना महामारीचे केंद्र असल्यामुळे आणि अनेक यापैकी थेट रुग्णाच्या संपर्कात असणारी कामे करत असल्यामुळे अनेक जण बाधित होत आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या परिवारातील लोकांनाही कोरोनाची बाधा होत आहे.
त्यामुळे वसई-विरारमध्ये मुंबईमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे अलीकडेच महापौर प्रवीण शेट्टी यांनी प्रशासनाला पत्र लिहून ज्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउन काळात मुंबईत कामासाठी जावे लागते, अशा कर्मचाºयांची सोय मुंबईतच करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून या महामारीच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यात येईल.
या महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाबंदी केली आहे, पण अशा पद्धतीने दोन जिल्ह्यांत ये-जा सुरू राहिली, तर ही महामारी पसरणारच. वसई-विरार महापालिकेनेही बाहेरून येणाºया त्यांच्या कर्मचाºयांची राहण्याची सोय वसई-विरारमध्येच केली आहे. तशी सोय मुंबई महापालिकेनेही केली पाहिजे.
- रोहन राऊत, स्थानिक रहिवासी
आता शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे. अनेक देशांनी त्यांचे जे कर्मचारी फ्रंट लाइनवर काम करत आहेत, त्यांना घरी जाण्यास मनाई केली असून त्यांची सोय कामावरच्या ठिकाणीच केली आहे. त्यामुळे त्यांचे परिवार सुरक्षित राहतील.
- विनय साठे, स्थानिक रहिवासी