coronavirus: ‘कैसे भी करके गाव जाना है!’ वसई-विरारमधील मजूरांची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 01:20 AM2020-05-14T01:20:18+5:302020-05-14T01:26:03+5:30
‘कैसे भी करके गाव जाना है साहब, यहा भीक मांग कर खाने से अच्छा गांव में एक वक्त की रोटी मिलेगी तो सही...’ असे म्हणणाऱ्या मजुरांच्या गावी जाण्याच्या ओढीचा फायदा काही खाजगी वाहनांनी घेतल्याचे दिसते.
- प्रतीक ठाकूर
विरार : परराज्यांतील अडकलेल्या मजुरांना गावी जाण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र आपला नंबर कधी लागेल याची काहीही खात्री नसल्याने हातावर पोट असलेल्या मजुरांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची स्थिती बिकट आहे. हाल होण्याच्या भीतीने मजुरांचे लोंढेच्या लोंढे जीवघेणा प्रवास करून आपल्या गावी जाण्याची धडपड करू लागले आहेत. ‘कैसे भी करके गाव जाना है साहब, यहा भीक मांग कर खाने से अच्छा गांव में एक वक्त की रोटी मिलेगी तो सही...’ असे म्हणणाऱ्या मजुरांच्या गावी जाण्याच्या ओढीचा फायदा काही खाजगी वाहनांनी घेतल्याचे दिसते.
तालुक्यातील संतोष भुवन, बिलालपाडा, डोंगरी, धानीव बाग, रामनगर, रामू कंपाऊंड, पेल्हार येथे मोठ्या प्रमाणात परराज्यातील मजूर राहतात. त्यांना आता हाताला काम नाही, जवळ पैसा नाही, यामुळे उपासमारीचे संकट ओढवले आहे. म्हणून जगण्यासाठी मिळेल तो मार्ग अवलंबून गावी जाण्याची त्यांची धडपड सुरू आहे.
ज्यांना अत्यावश्यक सेवांचे पास मिळाले आहेत अशा वाहनांमधून रोज रात्री नालासोपारा पूर्व संतोष भुवन येथून मजूर पाठवले जातात. एका मजुराकडून ३००० रुपये घेऊन ६० ते ७० माणसे एका वाहनात कोंबून कोणतीही परवानगी न घेता त्यांना गावी घेऊन जात आहेत. यात टेम्पो, कंटनेर, लॉरी यांचा समावेश आहे. अशाच प्रकारे माणसांची वाहतूक करणारे तीन टेम्पो अलीकडेच माणिकपूर पोलिसांनी पकडले होते. तरीही अशी वाहने दररोज या परिसरातून रात्रीच्या वेळी भरली जात आहेत. यात महिला, वृद्ध, लहान मुलांचाही समावेश असतो.
दोन महिन्यांपासून खिचडी खात आहोत. त्याचीही चव नकोशी झाली आहे. हाती काम नाही. इथे कुणी वाली नाही. मागून कधीपर्यंत खाणार? त्यापेक्षा गावी गेलो तर कुटुंबाबरोबर एक घास खाऊन जगू.
- जय वर्मा, मजूर
आॅनलाइन अर्ज करून आठवडा झाला तरी काही झाले नाही, यामुळे ज्या पद्धतीने जाता येईल, त्या पद्धतीने आम्ही गावी जात आहोत. मोबाइल अथवा कोणत्याही किमती वस्तू देऊन भाडे भरत आहेत. इथे खायला मिळते, पण गावी परिवाराचे पोट कसे भरणार म्हणून कसेही आम्हाला गावी जायचे आहे. - रवी यादव, मजूर