CoronaVirus Lockdown News: हाॅटेलबंदीने हिरावला गेला गोरगरीब महिलांचा रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 12:36 AM2021-04-08T00:36:45+5:302021-04-08T00:37:23+5:30

हाॅटेल, खाणावळी बंदचा फटका : पोळी-भाकरी बनवणारे हात रिकामे

CoronaVirus Lockdown News: Hotel ban deprives poor women of employment | CoronaVirus Lockdown News: हाॅटेलबंदीने हिरावला गेला गोरगरीब महिलांचा रोजगार

CoronaVirus Lockdown News: हाॅटेलबंदीने हिरावला गेला गोरगरीब महिलांचा रोजगार

Next

- सुनील घरत 

पारोळ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने हॉटेल व खाणावळी बंद करून त्यांना फक्त पार्सल सुरू ठेवण्यास मुभा दिल्याने याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला आहेच, त्याचबरोबर याचा जास्त फटका कामगारांना बसला असून यात रोज लागणाऱ्या पोळी-भाकरी बनवणाऱ्या महिलांचाही रोजगार हिरावला गेला आहे. 

वसई, विरार, नालासोपारामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून आता दिवसभरातील रुग्णांचा आकडा ८००वर गेल्याने प्रशासनाने सर्व आस्थापने बंद केली आहेत. यामध्ये हॉटेल पूर्णपणे बंद करत केवळ पार्सल सेवा ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने अनेक कामगारांना कामावरून कमी केले. यामुळे कामगारांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. यात पोळी-भाकरी बनवण्याची कामे करत असलेल्या महिलांनाही आता रोजगाराला मुकावे लागणार आहे, तर काहींना संसाराचा गाडा चालवण्यासाठी इतर व्यवसाय शोधण्याची वेळ आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने वर्षभरात हॉटेल व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकदा अटी-शर्तीवर हा व्यवसाय सुरू ठेवावा लागला. कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये ते लवकर संपेल, या आशेवर हॉटेल मालकांनी कामगारांना आर्थिक हातभार लावला, मात्र लॉकडाऊन वाढत गेले व काही महिने हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. 

तांदळाची भाकरी प्रसिद्ध
वसई तालुक्यात तांदळाची हातभाकरी प्रसिद्ध असून अनेक हॉटेलमध्ये ती मिळते. मांसाहारी खाणारे ही भाकरी खाण्यासाठी खास वसईत येतात. हॉटेल व्यावसायिक गावामध्ये जाऊन महिलांकडून या भाकरी बनवून घेतात. यामुळे गावातील महिलांना मोठा रोजगार निर्माण झाला होता, पण या लॉकडाऊनने तो हिरावून घेतल्याने आता जगायचे कसे? हा प्रश्न या महिला वर्गासमोर उभा ठाकला आहे.

व्यवसाय सुरू होताच आता पुन्हा पार्सल सेवा सुरू केल्याने पोळी-भाकरीची मागणी कमी झाल्याने या महिला कामगारांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. 

पोळी-भाकरी करण्याचे काम अनेक वर्षांपासून करत आहोत. लॉकडाऊनमध्ये आता हॉटेल सुरू नसल्याने अनेकींना या रोजगाराला मुकावे लागले आहे.
 - सुलभा जाधव

भाकरी आम्ही घरी बनवून हॉटेलमध्ये देत होतो. यामुळे घरी आम्हाला काम मिळत होते, पण हॉटेल बंद असल्याने हे काम बंद झाल्याने आता दुसरे काम शोधावे लागणार आहे.     - भारती बुजड

आता तुम्हीच सांगा, आम्ही जगायचे कसे?
वसई तालुक्यातील 
हॉटेल संख्या  २८० 

पोळी-भाकरीसाठी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या २२००

Web Title: CoronaVirus Lockdown News: Hotel ban deprives poor women of employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.