CoronaVirus Lockdown News: व्यापाऱ्यांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 12:12 AM2021-04-07T00:12:58+5:302021-04-07T00:13:08+5:30

दुकानबंदीसाठी प्रशासनाची कारवाई

CoronaVirus Lockdown News: Traders march on police station | CoronaVirus Lockdown News: व्यापाऱ्यांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध सुरू

CoronaVirus Lockdown News: व्यापाऱ्यांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध सुरू

Next

नालासोपारा : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांचा फटका व्यावसायिक, दुकानदार, व्यापाऱ्यांना बसला आहे.  कारवाईच्या धास्तीने अनेक दुकाने तसेच व्यवसाय मंगळवारी बंद होते, तर प्रशासनाने अनेक दुकानांवर बंदची कारवाई केली. दरम्यान, पुन्हा लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनला राज्यातील व्यापारी संघटना विरोध करत आहेत. एकीकडे मंगळवारी सकाळपासून मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार पालिका कर्मचारी आणि पोलीस अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता अन्य दुकाने बंद करत होते, तर दुसरीकडे संतप्त व्यापारी, दुकानदारांनी तुळिंज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढीत निषेध व्यक्त केला.

राज्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोना संसर्गाला रोखणे गरजेचे आहे; परंतु असे करताना उद्योगांवरील आर्थिक संकट लक्षात घेतले पाहिजे. कारण लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे कोलमडून पडतात, रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी आधीच अडचणीत सापडलेल्या व्यापारी, उद्योजक, दुकानदारांचा विचार करणे गरजेचे असून  दुकानदार, व्यावसायिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत मेडिकलप्रमाणे इतर दुकाने, व्यावसायिकांचाही समावेश करावा, अशी मागणी व्यापारी संघटना करत आहेत.

मंगळवारी सकाळच्या वेळी पोलीस हद्दीतील दुकाने बंद करत होते. मिनी लॉकडाऊन शनिवारी आणि रविवारी असताना पोलीस दुकाने का बंद करत आहे, यामुळे लोक संभ्रमात पडले होते. संतप्त १०० ते १५० दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी तुळिंज पोलीस ठाण्यात धाव घेत मोर्चा काढला. 

पोलिसांनी महानगरपालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांनी सोमवारी रात्री काढलेल्या आदेशाची प्रत दाखवून दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्याचे दाखवले. आयुक्तांनी व्यापारी, दुकानदारांना विचारात न घेता किंवा याबाबत काहीही न सांगता असे पाऊल का उचलले, असा सवाल उपस्थित केला.  

सामान्य नागरिकांना मनपा मुख्यालयात प्रवेशबंदी
मंगळवारी सकाळपासून वसई-विरार महानगरपालिकेच्या विरार येथील मुख्य कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशास मनपा आयुक्तांनी बंदी घातली आहे. आपत्कालीन व्यवस्था हाताळणाऱ्या महत्त्वाच्या कार्यालयात असे सरसकट प्रवेश नाकारणे अयोग्य असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.

संचारबंदी सर्वत्र लागू झाली असल्याने सोमवारी संध्याकाळी आयुक्तांनी आदेश काढला आहे. ४ एप्रिलला राज्य सरकारने पूर्ण राज्यासाठी कोरोनामुळे एसओपी दिलेली आहे. कोरोना रुग्णवाढीवर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारने दिले आहे. आयुक्तांनी सोमवारी संध्याकाळी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यतिरिक्त दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे.
- गणेश पाटील, 
जनसंपर्क अधिकारी, वसई विरार महापालिका

Web Title: CoronaVirus Lockdown News: Traders march on police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.