CoronaVirus Lockdown News: वसईतील व्यापाऱ्यांची पालिकेवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 12:41 AM2021-04-08T00:41:34+5:302021-04-08T00:41:40+5:30
दुकाने बंद ठेवण्याच्या निर्बंधांना विरोध : उपासमारीची वेळ येण्याची भीती
विरार : वसई-विरार महापालिकेने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घातलेल्या निर्बंधांना विरोध म्हणून शहरातील व्यापाऱ्यांनी बुधवारी दुपारी पालिकेवर धडक दिली. राज्य सरकारने सुरुवातीला सकाळी ७ ते संध्याकाळी ८ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा दिली होती; मात्र वसई-विरार महापालिकेने मंगळवारी जाहीर केलेल्या नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने ३० एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या या निर्बंधांमुळे उपासमारीची वेळ येणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
मागील वर्षी कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे एक वर्ष दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सरकारला सहकार्य केले आहे; यापुढे मात्र व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवणे परवडणारे नाही. त्यामुळे पालिकेने हे निर्बंध शिथिल करून व्यापाऱ्यांना दुकाने सुरू ठेवण्याची मुभा द्यावी, या मागणीसाठी वसई-विरारमधील व्यापाऱ्यांनी पालिकेवर ही धडक दिली होती. वसई-विरार शहरात पाच हजारपेक्षा जास्त व्यापारी आहेत. विविध व्यवसायात असलेल्या या व्यापाऱ्यांकडे भाडेतत्त्वावरील दुकाने आहेत. याशिवाय दुकानातील नोकर-चाकर, वीजबिल आणि व्यवसायात लागलेले लाखो रुपये, त्यासाठी काढलेली कर्जे याने हे व्यापारी मेटाकुटीस आलेले असतानाच पुन्हा एकदा त्यांच्यावर निर्बंध लादले गेल्याने पालिकेविरोधात प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान; वसई-विरार महापालिका मुख्यालयात मनाई आदेश लागू असल्याने पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी या व्यापाऱ्यांची भेट घेण्यास नकार दिला.