CoronaVirus Lockdown : पालघर जिल्ह्यामध्ये कठोर निर्बंधांचे, पोलीस प्रशासनाचा जागोजागी चोख बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 11:37 PM2021-04-10T23:37:30+5:302021-04-10T23:38:11+5:30
CoronaVirus Lockdown : राज्य सरकारने कोरोनामुळे कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते.
पालघर/नालासोपारा : वाढत्या कोरोनाचा वेग रोखण्यासाठी राज्य शासनाने शनिवारी आणि रविवारी वीकेण्ड लॉकडाऊनची घोषणा केली होती. यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच पोलीस प्रशासनाने जागोजाग चोख बंदोबस्त लावल्याने व नागरिकांनी स्वतःहून घरात राहून प्रतिसाद दिल्याने वसई-विरार महापालिकेसह पालघर जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांवर शुकशुकाट असल्याने कडक वीकेण्ड लॉकडाऊन यशस्वी झाला आहे.
राज्य सरकारने कोरोनामुळे कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते. पण याला दुकानदार, व्यापारी संघटना, हॉटेल व्यावसायिक, ज्वेलर्स असोसिएशन अशा विविध संघटनांनी विरोध दर्शवत रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा निषेध केला होता. यामुळे शुक्रवारी रात्रीपासून वीकेण्ड लॉकडाऊनला नागरिक प्रतिसाद देतात की नाही, याबाबत पोलीस प्रशासनाला शंका होती. यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी जिल्ह्यासह वसई तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रभारी अधिकाऱ्यांनी जागोजाग नाकाबंदी व चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोरोनाची साखळी खिळखिळी करण्यासाठी साथ
जव्हार : जव्हार शहरात नागरिकांनी शनिवारी कडक निर्बंधांचे काटेकोर पालन करत कोरोनाची साखळी खिळखिळी करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दिवसभर शहरात सर्वच दुकानांचे शटर डाऊन अन् रस्ते सामसूम होते. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. शासनाच्या शनिवार, रविवारच्या विकेंड लॉकडाऊन आदेशाबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था होती.
एकीकडे राज्य शासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत शनिवार, रविवारीही मुभा दिली असली तरी दुसरीकडे मात्र खासगी दवाखाने व मोजक्या मेडिकलशिवाय सरसकट दुकाने बंद होती. सकाळपासूनच जव्हार शहराच्या चारही नाक्यांवर व एस.टी. स्टँड बायपास रोडवर पोलिसांनी गस्त वाढवली होती.
प्रवासी वाहनांसह नागरिकांनाही अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास परवानगी नसल्याने गल्लीबोळात पोलीस गस्त घालीत उद्घोषणा करीत होते. दिवसभर शहर व परिसरात पोलीस वाहने फिरत असल्याने नागरिकांनी देखील घराबाहेर पडणे टाळले. यामुळे मुख्य शहरी भागांसह उपनगरीय परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते.