Coronavirus : बाजारपेठा, आठवडे बाजारांत शुकशुकाट, नुकसानीबद्दल व्यापारी, शेतकऱ्यांची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 01:43 AM2020-03-20T01:43:16+5:302020-03-20T01:45:06+5:30
कोरोनाच्या भीतीने काही ठिकाणी उत्स्फूर्त बंद केला जात आहे, मात्र त्याच वेळी व्यापारी, शेतकरी यांचे मोठे नुकसान होणार असल्याने नाराजीही व्यक्त केली जात आहे.
पालघर : जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा डोळ्यात तेल घालून काळजी घेत आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या बाजारपेठा तसेच आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. कोरोनाच्या भीतीने काही ठिकाणी उत्स्फूर्त बंद केला जात आहे, मात्र त्याच वेळी व्यापारी, शेतकरी यांचे मोठे नुकसान होणार असल्याने नाराजीही व्यक्त केली जात आहे.
नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने (अत्यावश्यक किराणा सामान), दूध, भाजीपाला तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू आणि औषधालय वगळून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयानी जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी जिल्ह्यातील बहुतांशी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील बीअर, वाइनशॉप, सर्व देशी दारूची दुकानेही बंद करण्यात आल्याने तळीरामांकडून नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी लाउडस्पीकरवरून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले, तर काही ठिकाणी उघडी दुकाने बंद करण्यासही सांगण्यात आले.
दरम्यान, बाजारपेठ ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, तसेच आर्थिक नुकसान होत असल्याचे व्यापारी असोसिएशनचे म्हणणे आहे. कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी आम्ही व्यापारी प्रशासनाशी सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. मात्र, सर्व दुकाने एकत्रच बंद केली जात असल्याने आमच्या उदरनिर्वाहाचे काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हातगाडी (ठेला) चालवून दिवसाकाठी ३०० ते ४०० रु पयांवर आमचे घर चालते. ३१ मार्चपर्यंत आम्ही आमचे आणि कुटुंबाचे पोट कसे भरायचे, असा सवाल जितेनभाई यांनी उपस्थित केला.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाºयांना मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची कार्यालये आणि तालुकास्तरीय कार्यालयांमधील नागरिकांच्या भेटीची वेळ रद्द करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता शॉपिंग मॉलसह हॉटेल्स, आस्थापना बंद ठेवल्याने हातावर पोट ठेवून जगणाºयांचा रोजगार बुडतो आहे, यामुळेच या आजाराच्या भीतीने घरची चूल विझण्याची काळजी हातगाडी चालविणाºया अनेक कामगारांनी व्यक्त केली होती.
नागरिकांनी ई-मेल वा दूरध्वनी करून संबंधित अधिकाºयांना तक्रारी कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात औद्यगिक क्षेत्रात दोन लाख २८ हजार कामगार आहेत. असे काही उद्योग बंद करण्याच्या दृष्टीने औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय तसेच कामगार विभागाला सूची बनवण्यास सांगण्यात आले आहे.
जव्हार बाजार आजही बंद, व्यापा-यांची साथ
जव्हार : शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने दुसºया दिवशीही बंद होती. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने जे पाऊल उचलले आहे, त्याला येथील व्यापारी वर्गाने साथ दिली आहे. मात्र रोज कमवून घर चालविणारे छोटे दुकानदार गोत्यात सापडले आहेत. त्यामुळे आता आपल्या कुटुंबाचे कसे होईल, आपले कुटुंब कसे चालवणार, असा प्रश्न त्याां पडला आहे. जव्हार तालुका हा ९५ टक्के आदिवासी तालुका असून येथे शेकडो आदिवासी बांधव बाजार करण्यासाठी येत असतात. तसेच जव्हारमध्ये मंगळवार आणि शुक्रवारी शहरात आठवडा बाजार भरतो. त्या वेळी शेकडो ग्राहक खरेदी करण्यासाठी शहरात येतात; मात्र आता आठवडा बाजारपण कधी सुरू होणार याबाबत अद्याप काहीच सूचना नाहीत. त्यामुळे व्यापारी वर्गाची चिंता वाढलेली आहे. आम्ही जनरल दुकान चालवतो, व्यापार करण्यासाठी आम्ही पतसंस्था तथा बँकेतून लोन काढतो. हे लोन भरण्यासाठी आम्हाला दररोज ५०० ते ३००० पर्यंत रोख पैसे भरावे लागतात. ही रक्कम आम्ही रोजच्या धंद्यात जमा झालेल्या रकमेतून भरतो. मात्र आता हे रोजचे हप्ते कसे भरायचे या संभ्रमात पडलो आहोत, अशी प्रतिक्रिया व्यापाºयांनी व्यक्त केली.
आम्ही रोज होलसेलरकडून माल आणून फेरी करून विक्र ी करतो; मात्र दुकाने बंद ठेवण्यात आल्यामुळे आम्हाला व्यापार कसा करायचा हा प्रश्न पडला आहे.
- सिकंदर समेळ,
फेरीवाला व्यापारी, जव्हार
कासा, चारोटी बाजारपेठा बंद
कासा : डहाणू तालुक्यातील कासा, चारोटी बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्य दुकाने गुरुवारपासून बंद करण्यात आली आहेत. काही ठिकाणी मात्र रस्त्यावरील थंड पेयाची दुकाने सकाळी सुरू होती. मात्र, नंतर तीही बंद करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासकीय आदेशानुसार किराणा दुकान, फळ, भाज्या आणि मेडिकल दुकाने वगळता बहुतेक दुकाने बंद ठेवण्यात आली होती. आदेशानुसार ही दुकाने ३१ तारखेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा व तालुका प्रशासन सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकानीदेखील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बोईसर-बेटेगावच्या बाजारांवर बंदी
बोईसर : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून पालघर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात भरणाºया आठवडी बाजाराला ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिल्याने आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी बेटेगांव व शुक्रवारी बोईसर येथे भरणाºया आठवडी बाजारावर दोन्ही ग्रामपंचायतीनी बंदी आणल्याने ब्रिटीश काळात सुरू झालेल्या व वर्षानुवर्षे प्रचंड गजबजणारा बेटेगांवच्या बाजार स्थळी गुरुवारी अक्षरश: शुकशुकाट होता.
नागरिकांची एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ‘बाजार बंदी’ची माहिती देणारे फलक या दोन्ही ग्रामपंचायतींनी जागोजागी लावले आहेत. त्याला व्यापाºयांनी चांगला प्रतिसाद देऊन सहकार्य केले. आता शुक्रवारी बोईसरचाही आठवडी बाजार अजिबात भरू नये म्हणून बोईसर ग्रामपंचायतीकडून सर्र्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
ग्रामीण भागातील आदिवासी आणि गोरगरिबांबरोबरच सर्वसाधारण नागरिकांना आठवडी बाजार म्हणजे शहरातील मॉलसारखा असतो. या बाजारांमध्ये नेहमीच मोठी उलाढाल होत असते.
बाजारांत ग्राहकांची गर्दी
या बाजारात गावठी भाजीपाला, सुकी मच्छी, कोंबडी, भांडी व कपडे याबरोबरच जीवनावश्यक वस्तू इत्यादी विक्रीसाठी व्यापारी, आदिवासी, मच्छीमार व शेतकरी घेऊन येत असतात. या आठवडी बाजारात सर्वच वस्तू व त्याही स्वस्त मिळत असल्याने ग्राहकांची प्रचंड मोठी संख्या असते.
कोरोनामुळे नाका कामगारांची पंचाईत
विरार : चीनमध्ये उद्भवलेल्या आणि जगभर धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या भीतीमुळे मोठमोठे उद्योगधंदे, बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. त्यातच दिवसभराच्या कमाईवर आपले पोट भरणाºया वसई, नालासोपारा, विरार शहरांतील नाका कामगारांचे मोठे हाल झाले आहेत. कोरोनाच्या धास्तीने सर्वच व्यवसाय बंद करण्यात आल्याने नाका कामगारांच्या हातालासुद्धा काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे या कामगारांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
नालासोपारा पूर्वेच्या उड्डाण पुलाखालील परिसरात दररोज शेकडोहून अधिक नाका कामगार कामाच्या अपेक्षेने रोज उभे असतात. यामधील बहुसंख्य कामगार हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आले आहेत, तर काही यूपी, बिहारमधून आले आहेत. यामधील निम्म्या कामगारांना दिवसाचे काम मिळून जाते. त्यानंतर दुसºया दिवशी पुन्हा नवीन कामाचा शोध घ्यावा लागतो. या कामगारांचे जगणे हे दिवसभराच्या कामावर अवलंबून असते. त्यामुळे ज्या दिवशी काम मिळाले त्या दिवशी घर चालते, मात्र ज्या दिवशी कामच मिळत नाही, त्या दिवशी मात्र काटकसर करावी लागत आहे.
कोरोनाच्या भीतीपोटी रोज काम मिळणे अवघड झाले आहे. दिवसभर अर्धा दिवस उलटूनसुद्धा कामे हाती लागत नाहीत. त्यामुळे रोज बिनकामाचे दिवस निघत आहेत. एखाद दिवशी काम हाती आले तर मोबदला तितका मिळत नाही. त्यामुळे आम्हाला आर्थिक चणचण भासत आहेत.
- किसन कालापाड, नाका कामगार