coronavirus: मुंबई-ठाण्याने वाढवली चिंता, कोरोनाबाधित ५० हजाराहून जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 03:21 AM2021-03-31T03:21:27+5:302021-03-31T03:22:18+5:30
coronavirus News : पालघर : जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यातील नागरिकांचा सातत्याने शेजारील मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांशी संबंध येत असल्याने आणि हे तीनही जिल्हे सक्रिय जिल्ह्यांत समाविष्ट असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.
- जगदीश भोवड
पालघर : जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यातील नागरिकांचा सातत्याने शेजारील मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांशी संबंध येत असल्याने आणि हे तीनही जिल्हे सक्रिय जिल्ह्यांत समाविष्ट असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यामध्ये मंगळवारी १६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
पालघर जिल्हा हा ग्रामीण आणि शहरी स्वरूपाचा असून येथील नागरिक नोकरी तसेच कामधंद्यानिमित्त मुंबई, ठाणे तसेच नाशिक या जिल्ह्यांमध्ये सातत्याने जात-येत असतात. तसेच शेजारील गुजरात राज्यामध्येही सीमावर्ती भागातील नागरिक नोकरी-धंद्यानिमित्त जात असतात. महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात राज्यामध्येही रुग्णसंख्या वाढत असल्याने तीन जिल्हे आणि एका राज्याशी पालघरमधील नागरिकांचा सातत्याने संपर्क होत असल्याने आगामी काळात कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. स्वत: जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे तसेच प्रशासनातील अन्य घटक सजग झाले असून कोरोना नियम धुडकावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वत: पुढाकार घेताना दिसत आहेत.
बाहेरगावाहून येणाऱ्यांची चाचणीच नाही
पालघर जिल्ह्यामध्ये मुंबई, ठाणे तसेच नाशिक या तीन जिल्ह्यांसह शेजारील गुजरात राज्यातील नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. तसेच जिल्ह्यातील नागरिकही कामाधंद्यानिमित्त शेजारील जिल्ह्यांमध्ये तसेच गुजरातमध्ये जात-येत असतात.
रेल्वे, एसटी, खाजगी वाहने यातून ही प्रवासी वाहतूक होत असते. मात्र अद्याप तरी कोणत्याही ठिकाणी चाचणी होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. गुजरातमधून खाजगी वाहनांनी महाराष्ट्रात येणारे लोक मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा अवलंब करीत असतात,
मात्र तलासरी तालुक्यातील चेकनाक्यावर त्यांची तपासणी केली जात नाही, परंतु गुजरातमध्ये प्रवेश करणाऱ्यांची तपासणी गुजरात पोलिसांनी सुरू केली असल्याचे दिसून आले आहे.
nकोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने प्रशासन सज्ज झाले असून नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दररोज शेकडो प्रवाशांची ये-जा
एसटी बस
पालघरमध्ये गुजरात राज्यासह मुंबई, ठाणे आणि नाशिक या तीन सक्रिय जिल्ह्यांमधून येणाऱ्यांची तसेच या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. शकडो प्रवासी एसटीतून येत-जात असतात. हे प्रवासी कोरोनाचे वाहक ठरू शकतात. मात्र अद्यापही प्रशासनाकडून पुरेशी काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत नाही.
ट्रॅव्हल्स
जिल्ह्यात गुजरात, राजस्थान आदी राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. मात्र मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अजूनही पुरेशा प्रमाणात तपासणी केली जात नाही. त्यामुळे नियम पाळणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तर आदेश मिळताच तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
रेल्वे
जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने मुंबईला तसेच ठाणे येथे नोकरीसाठी जात असतात. अनेकांना रेल्वेसेवेचाच आधार घ्यावा लागतो. लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. रेल्वेमध्ये अनेक प्रवासी मास्क वापरत नसल्याचेही दिसून येत आहे.