Coronavirus: कधी वाटले नव्हते, हा विषाणू आपले घर शोधत येईल! आपल्या प्रिय व्यक्ती गमवाव्या लागल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 02:47 AM2021-03-22T02:47:02+5:302021-03-22T02:47:28+5:30
पालघर जिल्ह्यात वर्षभरात ४७,६४७ जण बाधित : १,२०९ रुग्णांनी गमावला जीव, कोरोनाने आमच्या घरात प्रवेश केला अन् यामध्ये माझे मोठे बंधू यांना कोरोनाबाधा झालाी. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ती परिस्थिती इतकी वाईट होती की, आम्हाला त्याचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही
सुरेश काटे/हितेन नाईक
पालघर : कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असून देशात गेल्या वर्षी २२ मार्चला जनता कर्फ्यू लावण्यात आला. संध्याकाळी सर्वांनी थाळीनाद केला आणि दुसऱ्या दिवसापासून म्हणजे २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाला. या वर्षभराच्या कालावधीत पालघर जिल्ह्यात तब्बल ४७ हजार ६४७ जण कोरोनाने बाधित ठरले असून १ हजार २०९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४५ हजार २८५ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. असे असले तरी कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे घरातील माणसेसुद्धा रुग्णासोबत राहू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ‘कोरोनाने मला काय शिकवले,’ याविषयी घेतलेला हा आढावा.
तलासरी : संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपुऱ्या वैद्यकीय सोयीसुविधांमुळे रुग्णसंख्या जास्त वाढत असून कोरोनामुळे मृत्यू पडणाऱ्या लोकांची संख्याही लक्षणीय आहे. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे लोकसुद्धा कोरोनाबाधित रुग्णापासून लांब राहात असून घरातील माणसेसुद्धा रुग्णासोबत राहू शकत नाहीत, अशी विचित्र परिस्थिती. त्यातच एखादा रुग्ण दगावला तर त्याच्या कुटुंबातील लोकांचा आक्रोश ऐकून तर खूप वाईट वाटते. अंगावर काटा येतो. कधी वाटले नव्हते की, हा विषाणू आपलेही घर शोधत येईल. अन् झालेही तसेच.
कोरोनाने आमच्या घरात प्रवेश केला अन् यामध्ये माझे मोठे बंधू यांना कोरोनाबाधा झालाी. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ती परिस्थिती इतकी वाईट होती की, आम्हाला त्याचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही. कोरोना रुग्णाचा अंत्यविधी आपल्याला करता येत नाही. तो रुग्णालयामार्फत केला जाताे. ना अंत्ययात्रा, ना खांदा, ना रामनाम, जीवाचा दगड लांबच राहिला, रुग्णालयातून बंद केलेली बॉडी रुग्णवाहिकेतून स्मशानात चेहरा न बघताच अग्नी, कुठले मडके अन् फेरे, तोंडात ना पाणी, ना तुळशीचे पान. येथेच आपले दुर्दैव संपत नाही. अशा परिस्थितीत कुटुंबातील सर्वांची कोरोना टेस्ट करावी लागते. त्याहून मोठी शिक्षा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागते. तुरुंगापेक्षा वाईट अवस्था. घराला नगरपंचायतीमार्फत टाळे लावले जाते. तेव्हा आपली जवळची माणसेसुद्धा आपल्यापासून लांब राहतात. कोणी बोलतसुद्धा नाही. शेजारी तर आपण फार मोठा गुन्हा केला आहे अशा नजरेने हळूच दार उघडून आपल्याला बघतात. तेव्हा खऱ्या अर्थाने समजते कोण आपले आणि कोण परके? कधी कधी वाईटातूनही चांगले घडते. गेल्या वर्षात कोरोनामुळे हिंदुस्थानी जनतेला चांगले काय दिले तर कटाक्षाने पाळावी लागणारी स्वच्छता. स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवायचे काम या कोरोना नावाच्या इवल्याशा विषाणूने एका झटक्यात करून दाखविले.
आपल्या प्रिय व्यक्ती गमवाव्या लागल्या!
पालघर : संपूर्ण जगाला कोरोनाने वेठीस धरल्याची ओरड सर्वत्र दिसून येत असताना कोरोनाने काही सकारात्मक तर काही नकारात्मक अंगाने अनेक बदल घडविल्याचे पाहावयास मिळाले. आमचा समुद्र, खाड्या औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाने काळवंडून त्यावर जगणाऱ्या हजारो गरीब मच्छीमार कुटुंबांचे मासेमारीचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले होते.
कोरोनामुळे औद्योगिक कारखान्याची धडधड कमी झाल्याने आपोआपच प्रदूषण कमी होत समुद्र, खाड्या स्वच्छ झाल्याने माशांची आवक वाढत शेकडो गरीब कुटुंबांना पुन्हा रोजगाराची संधी निर्माण करून दिल्याचे दिसले. त्याचप्रमाणे या कालावधीत काही कुटुंबीयांना आपल्या प्रिय व्यक्तींना गमवावे लागल्याच्या घटना मनाला खूप वेदना देणाऱ्या ठरल्या.
जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी, पालघर बिडको, जेनेसीस उद्योग समूहासह अनेक औद्योगिक क्षेत्रात नोकरीनिमित्त जाणाऱ्या स्थानिक कामगारांना आपल्या नोकरीवर पाणी फेरावे लागले. औद्योगिक क्षेत्रात काम करणारा परप्रांतीय मजूरही गावी निघून गेल्याने कारखान्यांची धडधड थांबली. परिणामी बोईसर एमआयडीसीमधून होणारे प्रदूषण थांबल्याने दांडी, उच्छेळी, नवापूर, आलेवाडी, मुरबे, सातपाटी, वडराई अशा किनारपट्टीवरील गावांसमोरील प्रदूषणाने काळ्या-पिवळ्या पडलेल्या खाडी, समुद्राचे पाणी स्वच्छ व नितळ झाल्याचे पाहावयास मिळाले. परिणामी प्रदूषणाने रॉकेलमिश्रित वास येत असल्याने खाडीतील उपळ्या-वाड्या शिंपल्या, बोय, चिंबोरी,
कालवे आदी माशांना नाकारणारी स्थानिक मंडळी पुन्हा बाजाराकडे वळू लागली. समुद्रात स्वच्छ पाणी येऊ लागल्याने माश्यांचे प्रमाणही वाढले. त्यामुळे शेकडो कुटुंबीयांची पावले जाळी, टोपल्या घेऊन पुन्हा समुद्र, खाड्यांकडे वळली असून अनेक कुटुंबीयांचा उदरनिर्वाह पुन्हा सुरू झाल्याचे पाहावयास मिळते. याव्यतिरिक्त रोजगार, नोकऱ्यां-निमित्ताने घडाळ्याच्या काट्यावर धावणारी मंडळी भेटू लागली. मोबाईलद्वारे बोलू लागली. भेटू लागली. वाचन वाढले. अशा गतकाळात हरवून बसलेल्या सकारात्मक बाबीही उपभोगायला मिळाल्या.