CoronaVirus News: वसई-विरार महापालिका परिसरामध्ये रक्ततुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 12:14 AM2021-04-09T00:14:33+5:302021-04-09T00:14:42+5:30
रक्तदान शिबिरे आयोजित करावीत : पालिका प्रशासनाचे सामाजिक संस्थांना आवाहन
- आशिष राणे
वसई : वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महापालिका हद्दीत रक्ततुटवडा भासू शकतो, असे लक्षात येताच महापालिका वैद्यकीय आरोग्य प्रशासनाने शहरांतील सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी परवानगी देण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.
अशी शिबिरे आयोजित करणाऱ्या आयोजकांना आवाहन केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमतला दिली.
सद्यस्थितीत कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाकडून 'ब्रेक दी चेन' अंतर्गत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. तर थॅलेसेमियाच्या रुग्णांना नियमित रक्त संक्रमणाची आवश्यकता असते तसेच प्रसूती, अपघात, शस्त्रक्रिया इत्यादींसाठी आपात्कालीन परिस्थितीत रक्ताची आवश्यकता असते. किंबहुना राज्यात व वसईतही रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करत शहरातील विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था, राजकीय, धार्मिक संस्था इ. आयोजकांमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असते. त्यानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र शासनाने राज्यात सर्वत्र निर्बंध लागू केलेले आहेत. परंतु, या निर्बंधातून वैद्यकीय व आरोग्यसेवा यांना सूट देण्यात आलेली आहे. तसेच रक्त संक्रमण सेवेलाही या निर्बंधातून सूट देण्यात आलेली आहे.
दरम्यान, आयोजकांकडून रक्तदान शिबिरे ही साधारणत: शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी आयोजित केली जातात. तसेच आता रक्ताची गरज असल्याने रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी परवानगी देण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी ६ एप्रिल रोजी पत्र निर्गमित केले आहे. त्यानुषंगाने वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात आयोजकांनी कोविडसंदर्भात दिलेल्या व रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे व नियमांचे पालन करून तसेच महापालिका वैद्यकीय आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांची परवानगी घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित करावी, असे आवाहन वसई- विरार शहर महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
प्रसूती, अपघात, शस्त्रक्रिया इत्यादींसाठी आपात्कालीन परिस्थितीत रक्ताची आवश्यकता असते. राज्यात व वसईतही रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे, यासाठी आवाहन करण्यात आले आहे.