CoronaVirus News : मीरा भाईंदरमधील नागरिकांना 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रांमुळे दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 03:18 PM2020-09-22T15:18:35+5:302020-09-22T15:19:24+5:30
कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनची लागणारी गरज पाहता आमदार गीता जैन यांनी त्यांच्या आमदार निधीमधून १० 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रे महापालिकेला उपलब्ध करून दिली आहेत.
मीरारोड : मीरा भाईंदरमधील कोरोनाग्रस्त नागरिकांसाठी आमदार गीता जैन यांच्या आमदार निधीतून १० 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रे मिळाले आहेत . यामुळे श्वास घेण्यास शक्य नसणाऱ्या अतिगंभीर रुग्णांना दिलासा मिळेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना श्वास घेण्यास अडथळा होत असल्याने त्यांच्यासाठी ऑक्सिजनची सुविधा पालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयासह प्रमोद महाजन सभागृह रुग्णालयात करण्यात आली आहे. परंतु श्वास घेणे अगदीच अशक्य असणाऱ्या व जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना दुसरा पर्याय नसल्याने व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. त्यामुळे व्हेंटिलेटर अतिगंभीर रुग्णांसाठी अनेकवेळा रिकामी मिळत नाही .
कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनची लागणारी गरज पाहता आमदार गीता जैन यांनी त्यांच्या आमदार निधीमधून १० 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रे महापालिकेला उपलब्ध करून दिली आहेत. सुमारे ३० लाखांचा खर्च या 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रांसाठी झालेला आहे. भीमसेन जोशी कोरोना रुग्णालयात सदर यंत्रे देण्यात आला आहेत. यावेळी आमदार गीता जैन यांच्या सह आयुक्त डॉ. विजय राठोड, नगरसेवक अश्विन कासोदरिया, माजी नगरसेवक ओमप्रकाश अग्रवाल आणि प्रतिभा पाटील, डॉ. सुरेश येवले, रिया म्हात्रे, नारायण नांबियार , वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
या 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रामुळे जास्त ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना या यंत्राचा मोठा उपयोग होणार आहे. शिवाय व्हेंटिलेटरची गरज न भासल्याने त्याचा वापर अन्य गरजू रुग्णांसाठी करता येणार आहे, असे आमदार गीता जैन म्हणाल्या.