CoronaVirus News : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात, जीवघेण्या आजाराचे नवीन रुग्ण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 11:33 PM2020-11-06T23:33:57+5:302020-11-06T23:49:05+5:30
CoronaVirus News in Palghar district : पालघर जिल्ह्यामध्ये शुक्रवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ४१ हजार ३७५ वर पोहोचली आहे, मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे यातील ३९ हजार४४५ रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत.
पालघर : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मध्यंतरीच्या काळात खूपच वाढला होता. अद्यापर्यंत एकूण बाधितांच्या संख्येने ४१ हजारांचा टप्पा पार केलेला आहे. कोरोनाचा सामाजिक संसर्ग होऊन बाधितांची संख्या आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता होती, मात्र प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य यंत्रणेने दिवस-रात्र मेहनत घेऊन या जीवघेण्या आजारावर नियंत्रण आणण्यात यश मिळवले आहे. यामुळे आता नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण खूपच कमी झालेले असून त्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये शुक्रवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ४१ हजार ३७५ वर पोहोचली आहे, मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे यातील ३९ हजार४४५ रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या जीवघेण्या आजारात १ हजार ४३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यामध्ये वसई-विरार महानगरपालिका परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळले होते. मुंबई-ठाणेच्या नजीक असलेल्या या महानगरातील लोक मुंबई-ठाणे येथे मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी जात असल्याने या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला हे उघड आहे.
वसई-विरारमध्येच २६ हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्याने मध्यंतरी चिंता व्यक्त होत होती, मात्र आता या परिसरातही बरे होऊन घरी परतणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वसई-विरारमधील २५ हजार ६७० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. वसई-विरार परिसरात या आजारात ७५६ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. सध्या वसई-विरारमध्ये केवळ ५६४ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. मात्र त्याच वेळी एकूण रुग्णसंख्या आणि बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचेच दिसून येत आहे. अर्थात यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने घेतलेली मेहनत खूपच महत्त्वाची आहे.महत्त्वाची आहे.
तलासरी कोरोनामुक्त
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यामध्ये शुक्रवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तसेच या तालुक्यात एकही रुग्ण रुग्णालयात दाखल नाही. तालुक्यात एकूण २५५ रुग्ण बाधित आढळलेले होते. मात्र त्यापैकी २५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर तालुक्यातील ४ रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.