CoronaVirus News : डहाणूच्या २५ गावांतील डायमेकिंग व्यवसाय ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 01:59 AM2020-06-23T01:59:38+5:302020-06-23T02:00:04+5:30
अवलंबून असणाऱ्या जवळपास २५ हजार कुशल, अकुशल आणि असंघटित कारागीरांवर आर्थिक संकट कोसळले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
शौकत शैख
डहाणू : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील २५ गावांतील गेल्या ८०-९० वर्षांपासून सुरू असलेला डायमेकिंग व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यावर अवलंबून असणाऱ्या जवळपास २५ हजार कुशल, अकुशल आणि असंघटित कारागीरांवर आर्थिक संकट कोसळले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
मुंबईपासून अवघ्या १२० किलोमीटरवर असणाºया डहाणू तालुक्याला केंद्र सरकारने हरित पट्टा म्हणून घोषित करून उद्योगधंदे उभारण्यास बंदी घातलेली आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर चालणारा डायमेकिंग व्यवसाय हेच येथील तरुणांचे उत्पन्नाचे साधन असून त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालत होता, मात्र कोरोना संसर्गाच्या काळात सरकारने लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केल्याने वाहतूक व्यवस्था तसेच टपाल व्यवस्था ठप्प झाली. त्याचबरोबर ज्या सोन्या-चांदीच्या पायावर हा डायमेकिंग व्यवसाय उभा होता, ते सोनेच प्रचंड महाग झाल्याने सराफांची दुकानेही बंद पडली. त्यामुळे डायमेकिंग व्यवसाय ठप्प होऊन या कारागीरांवर बेकारीची पाळी आली असून त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
डहाणूच्या किनारपट्टीतील चिंचणी, तारापूर, वरोर, वाढवण, धाकटी डहाणू, ओसार, वासगाव, गुंगवाडा, तडियाळे, बाडापोखरण, वाणगाव, बावडा, कोलोली इत्यादी खेडोपाड्यांत होणारा डायमेकिंग व्यवसाय हा आता आधुनिक तंत्रज्ञान वापरून केला जातो. त्यासाठी सरफेस ग्रँडर, एक्सोमशीन, ड्रिल मशीन, त्याचबरोबर प्रत्येकी बारा लाख किंमत असलेली वायरकट, सी.एन.सी.ची दोनशे मशिन विविध बँकांतून कर्ज घेऊन या डायमेकर्स लोकांनी बसविली आहेत. त्या कर्जाचा बोजा डोक्यावर बसला असून त्याचे हप्ते भरायचे कसे, या चिंतेत येथील डायमेकर्स सापडले आहेत.
या ठिकाणी बनविण्यात येणाºया डायची किंमतही तिच्या डिझाईनवरील कलाकुसरीवर अवलंबून असून ती हजार रुपये ते दहा-पंधरा हजार रुपये असू शकते. या डाय बनवून घेण्यासाठी दिल्ली कोलकाता, पंजाब, राजस्थान, चेन्नई, मुंबई, केरळ, हैदराबाद, गुजरात येथून गिºहार्ईके गावांत येत असतात. शिवाय आॅर्डरप्रमाणे काही डाय पोस्ट किंवा कुरिअरने पाठविल्या जातात, तर नेपाळ, दुबई, पाकिस्तान, सौदी अरेबिया, रियाध या देशांतही एजंटमार्फत डाय बनवून घेतल्या जातात. त्यापासून देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळत असते.
>मुख्यमंत्र्यांशी झाले बोलणे
डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील खेडोपाड्यांत डायमेकिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. परंतु सध्या ते बंद असल्याने त्यांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. याबाबत माझे राज्याचे मुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्र्यांबरोबर बोलणे झाले आहे.
- राजेंद्र गावित, खासदार, पालघर लोकसभा मतदारसंघ