CoronaVirus News: मुंबईजवळच्या 'त्या' परिसरात कोरोनाची एंट्री; मिनी धारावीनं प्रशासनाची चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 11:18 PM2020-06-16T23:18:49+5:302020-06-17T07:12:03+5:30

वसई-विरारमधील ‘मिनी धारावी’ : हॉटस्पॉटमुळे नागरिकांमध्ये भीती

CoronaVirus News: Increased threat of group contact in Nalasopara city | CoronaVirus News: मुंबईजवळच्या 'त्या' परिसरात कोरोनाची एंट्री; मिनी धारावीनं प्रशासनाची चिंता वाढवली

CoronaVirus News: मुंबईजवळच्या 'त्या' परिसरात कोरोनाची एंट्री; मिनी धारावीनं प्रशासनाची चिंता वाढवली

googlenewsNext

नालासोपारा : वसई-विरारमध्ये कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान माजवले असून आतापर्यंत कोरोनाचा आकडा दीड हजाराच्या वर गेला आहे. पालिका हद्दीत नालासोपारा शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असून आढळणारी रुग्णसंख्या सर्वाधिक असून शहरातील जनजीवन भीतीच्या सावटाखाली आहे. त्याखालोखाल विरार आणि वसईचा क्रमांक लागतो. तिन्ही शहरांत कोरोना विषाणूने कहर माजवला आहे.

नालासोपाऱ्याच्या मिनी धारावीत कोरोनाने एन्ट्री केल्याने समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे महापालिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे. आधीच कोरोनाग्रस्तांचा आकडा दुपटीने वाढत असून त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. पावसाळ्यात आर्द्रता जास्त असल्याने कोरोनाचा धोका मोठा आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नागरिकांनी याच काळात अधिकाधिक काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
वसई-विरारमधील रुग्णालयांतील खाटा फुल्ल झाल्या असल्याने रुग्णांची उपचाराविना परवड होत आहे. अशात समूह संसर्गाची चिंता महापालिका प्रशासनाला भेडसावत आहे. नालासोपारा शहर हे अत्यंत दाटीवाटीने गजबजलेले शहर आहे. येथील लोकवस्तीचा वेग प्रचंड आहे. रविवारी एकाच दिवसात पालिका हद्दीत ९२, तर सोमवारी ७६, तर मंगळवारी ९७ रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाचा धोका अजून वाढला आहे. नागरिकांनी आपत्ती काळाचा धोका पाहता विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पोलीस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण होत असल्याने अपुºया कर्मचाºयांवर आता ताण येऊ लागला आहे. वसई, विरारमधील नागरिकीकरणाचा वेग मोठा आहे. अनेक परप्रांतीय नागरिक आपापल्या गावी परतले आहेत. ‘अनलॉक’मध्ये नियम शिथिल केल्यानंतर मोठी गर्दी ठिकठिकाणी ओसंडून वाहताना दिसत आहे. साहजिकच त्याचा फटका कोरोना वाढीमध्ये बसत आहे. सध्या वसई- विरारमधील रुग्णांचा वाढता धोका आणि त्यातही नालासोपारासारख्या मिनी धारावीच्या दिशेने कोरोनाने केलेली एन्ट्री ही आणखी धोक्याची घंटा ठरली आहे. त्यामुळे समूह संसर्गाची भीती असून महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा ताण वाढला आहे.

सर्वाधिक रुग्णांमुळे चिंता
नालासोपारा पूर्वेकडील आणि पश्चिम परिसरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून नालासोपारा शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी रात्रीपर्यंत १,६८० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून नालासोपारा शहरात सर्वाधिक ८२५ रुग्ण आहेत. विरार शहरात ५०२ रुग्ण, वसई व नायगाव शहरात ३४९ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी नालासोपारा शहरात ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: CoronaVirus News: Increased threat of group contact in Nalasopara city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.