CoronaVirus News: रुग्ण पॉझिटिव्ह असताना उरकले लग्न, वरात मंडळींवर ओढवलं संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 05:03 PM2020-06-13T17:03:54+5:302020-06-13T17:12:41+5:30
काही दिवसांपूर्वी एक पॉझिटिव्ह बस चालक हा नोकरीवरून आल्यानंतर त्याला त्रास होऊ लागला, तो एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेला
हुसेन मेमन
जव्हार - ग्रीन झोनमध्ये असलेला जव्हार तालुक्याला गालबोट लागले असून, सध्या शहरात १० पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. एका शासकीय बस चालकाच्या संपर्कात आलेल्या खासगी दवाखान्याच्या तीन नर्स व एका व्यवस्थापकाला कोरोनाची लागण झाली असून, काही दिवसांपासून या चौघांच्या संपर्कात असलेले शेकडो रुग्ण व कुटुंबीयांची आरोग्य विभागाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी एक पॉझिटिव्ह बस चालक हा नोकरीवरून आल्यानंतर त्याला त्रास होऊ लागला, तो एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेला.
त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याला सरकारी रुग्णालयात पाठविले, तेथून त्याचे स्वाब दोनवेळा पाठविण्यात आले, मात्र अहवाल निगेटिव्ह आले, यात पाच ते सहा दिवसांचा अवधी लागला, दरम्यान तिसरा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे आरोग्य विभागाने त्याच्या संपर्कातील त्या दवाखान्यातील कर्मचा-यांचे स्वाब तपासणीसाठी पाठविले, शुक्रवारी उशिरा यातील तीन नर्स कर्मचारी तर एका व्यवस्थापकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान व्यवस्थापकाचे लग्न कार्यही अहवाल येण्यापूर्वीच उरकले, त्यामुळे दवाखान्यातील उपाचारासाठी आलेले रुग्ण तथा लग्न कार्यासाठी जमलेली मंडळी अशी मोठी संख्येनं कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यात मोठे संकट कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. स्वाब घेतलेले रुग्ण बाहेर कसे गेले, नोकरीवर कसे गेले, आता हा प्रश्न निर्माण झाला असून, स्थानिकांनी प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबाबत विरोध केला आहे. शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.