CoronaVirus News: कोरोना उच्चाटनासाठी सरकारने काय करायला हवे? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 01:01 AM2021-04-05T01:01:02+5:302021-04-05T01:01:18+5:30

वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, विविध घटकांच्या प्रतिनिधींनी कोरोना रोखण्यासंदर्भात सरकारला काही सूचना केल्या आहेत.

CoronaVirus News: What should the government do to eradicate Corona? | CoronaVirus News: कोरोना उच्चाटनासाठी सरकारने काय करायला हवे? 

CoronaVirus News: कोरोना उच्चाटनासाठी सरकारने काय करायला हवे? 

Next

कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी त्यांची मते जाणून घेतली, अनेक उपाययाेजनांचा आढावा घेतला. त्यानंतर राज्य सरकारने कठोर निर्बंधांसह अंशतः लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतरही वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, विविध घटकांच्या प्रतिनिधींनी कोरोना रोखण्यासंदर्भात सरकारला काही सूचना केल्या आहेत. या मतांचा सरकार नक्की विचार करेल. या सूचनांचा संक्षिप्त आढावा...

कायद्याचा बडगा उगारला पाहिजे
लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. वाढलेली प्रचंड लोकसंख्या व दाटीवाटीत राहत असलेल्या लोकवस्त्या याचा प्रचंड ताण आरोग्य यंत्रणेवर पडून शासनाच्या उपाययोजना कमी पडत असल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यासाठी सरसकट सर्वांना लस उपलब्ध करून लसीकरणाचा वेग वाढला पाहिजे व सर्वसामान्य नागरिकांमध्ये कोरोना महामारीविषयी जनजागृती केली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी कायद्याचा बडगा उगारला गेला पाहिजे. कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तरच यावर नियंत्रण मिळवता येईल. 
-ॲड. दीपक भोईर, वाडा

कडक लॉकडाऊन लावला पाहिजे
ज्याप्रमाणे महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, ते पाहता लोकांनी शिस्त बाळगली नाही, तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय दिसत नाही. शासनाने लोकांची वागणूक दोन-चार दिवस पाहावी. लॉकडाऊन एक किंवा दोन आठवडे केल्याने काही होणार नाही. कमीत कमी २८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागला पाहिजे. जेणेकरून रुग्णवाढीची ही सायकल तुटली तरच महिन्याभराने रुग्णसंख्या कमी होईल. लोक बेशिस्तपणे वागत आहेत. शासनाने २८ दिवसांच्या लॉकडाऊनसाठी समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून रोज किंवा गरीब लोकांच्या रेशनपाण्याची सुविधा केली पाहिजे. आज जगात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने सर्वांना वॅक्सिनची गरज आहे. 
- डॉ. ओमप्रकाश दुबे, चेअरमन, मेडिकल कॉलेज, नालासोपारा

 हातावर पोट असणाऱ्यांना फटका 
लॉकडाऊन हा सामान्य माणसासाठी कठीण काळ ठरू शकतो. यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. यात हातावर पोट असणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. तरी प्रशासनाने कोरोनाबाबत कडक निर्बंध घालावे तसेच लसीकरणाचा वेग वाढवावा. ग्रामीण भागातही लसीकरणाबाबत जनजागृती करावी.
- राजेंद्र पाटील, अध्यक्ष,
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.

हलगर्जीपणा केला तर प्रादुर्भाव वाढेल
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी. कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्क, वापरावे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. लग्न व इतर समारंभासाठी दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन नागरिकांनी करावे. जर आपण हलगर्जीपणा केला तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी मदत होईल. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नसून यामुळे सामान्य माणसाला फटका बसण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकांचा विचार करून सरकारने योग्य पाऊल उचलावे.
- राजेश पाटील, आमदार, बोईसर

कडक निर्बंध लागू करावेत 
लॉकडाऊन पुन्हा झाले तर मनोर परिसरातील सर्वसामान्य  नागरिक व मोलमजुरी करणारा आदिवासी समाज यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. त्यापेक्षा निर्बंध कडक करावे, हे चालेल. नियमांचा पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, पण लॉकडाऊन नको.
- ॲड. तक्की चिखलेकर, मनोर

सर्वांनी नियमांचे पालन करूया
पहिले लॉकडाऊन झाले होते, त्याचा परिणाम अजून जनता भोगतेय. पुन्हा ती पाळी आली तर भयानक परिस्थिती निर्माण होईल. तसेच आपण स्वतः आपली काळजी घेतली पाहिजे. नियमांचे पालन केले तर पुन्हा ती वेळ येणार नाही हेसुद्धा तितके महत्त्वाचे आहे. कोरोनाचा आपण स्वतः सामना करूया. नियमांचे पालन करूया. 
- मेहर निगार बेग, अध्यक्ष, मनोर लेडीज ट्रस्ट, मनोर

कोरोनाची दुसरी लाट भयावह 
देशात कोरोनाची दुसरी लाट भयावह होत आहे. चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेने शैक्षणिक कार्याबरोबरच गेल्या एप्रिल-२०२० पासून अनेक प्रकारचे सहकार्य नागरिकांना केले आहे. हे सर्व टाळण्याचा त्यातला त्यात परिणामकारक मार्ग म्हणजे सार्वत्रिक लसीकरण होय. 
- रजनीकांतभाई श्रॉफ, चेअरमन, 
चिंचणी तारापूर एज्युकेशन सोसायटी चिंचणी, ता डहाणू.

गोरगरिबांचा विचार करायला हवा
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार, असे समजते. परंतु, गेल्या वर्षभराच्या लाॅकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. पुन्हा लाॅकडाऊन झाल्यास आदिवासी तसेच सर्वसामान्य लोकांवर उपासमारीची वेळ ओढवेल. सरकारने गोरगरीब माणूस उपाशी राहणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य निर्णय घ्यावा.
- कल्पेश धोडी, सरपंच, ग्रामपंचायत चिंचणी

Web Title: CoronaVirus News: What should the government do to eradicate Corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.