coronavirus: रुग्णांची गुजरात सीमेवर अडवणूक; गुजरात सरकारचे पत्र असेल तर सोडू, पोलिसांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 03:22 AM2020-05-15T03:22:30+5:302020-05-15T03:22:38+5:30
सातपाटी येथील प्रणय तरे हा तरुण मोटारसायकल अपघातात जायबंदी झाल्यानंतर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले.
पालघर : गुजरात राज्यातील रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रीतसर परवानगी घेऊनही गुजरातच्या सीमेवर पोलिसांकडून रुग्णांची अडवणूक होत असल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र नाही, तर गुजरात सरकारचे पत्र असेल तरच आम्ही प्रवेश देऊ, असे सीमेवरील पोलीस सांगत आहेत. यामुळे स्वस्त व विनामूल्य सेवेच्या आशेने गुजरातमध्ये जाणाºया रुग्णांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो.
सातपाटी येथील प्रणय तरे हा तरुण मोटारसायकल अपघातात जायबंदी झाल्यानंतर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. मात्र उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येईल असे सांगण्यात आल्याने आणि घरची गरीब परिस्थिती असल्याने प्रणयच्या नातेवाइकांनी त्याला गुजरातमधील सुरत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर काही हजारांत शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर लॉकडाउनमुळे जिल्हाबंदी जाहीर केल्याने प्रणयला तपासणीसाठी जाता आले नाही. दरम्यानच्या काळात त्याचा त्रास वाढल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर अर्ज करून परवानगी पत्र मिळविले. गुरुवारी एका रुग्णवाहिकेतून बहीण अक्षता मोरे हिच्यासह गुजरात येथे जात असताना महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील आच्छाड नाक्यावर तैनात गुजरात पोलिसांनी त्यांना अडवले. पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले परवानगीचे पत्र पोलिसांना दाखवून, आम्ही उपचारासाठी चाललो असल्याचे सांगूनही त्यांनी प्रवेश देण्यास नकार दिला. महाराष्ट्रातील जिल्हाधिकाºयांचे पत्र नाही, तर गुजरात सरकारचे पत्र असेल तरच आम्ही प्रवेश देऊ, असा पवित्रा त्यांनी घेतला. अनेक विनंत्या करूनही पोलीस ऐकत नसल्याने शेवटी अक्षता मोरे हिने उपस्थित डॉक्टरांच्या टीमला आपली कागदपत्रे दाखवली. शेवटी एक ते दोन तासांनी त्यांना सोडण्यात आले. त्यामुळे येथून गुजरात, सिल्वासा येथे उपचारासाठी जाणाºयांसाठी गुजरात प्रशासनाने जातीने लक्ष घालून आपल्या पोलिसांना सूचना देण्याची रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी आहे.