coronavirus: पालघर जिल्ह्याला मनुष्यबळ, निधी कमी पडू दिला जाणार नाही - जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 01:46 AM2020-07-11T01:46:17+5:302020-07-11T01:46:37+5:30
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रथम डहाणू तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोनाचा मृत्युदर १.३ टक्के असून औषधे व साहित्याबाबत प्रशासन स्वयंपूर्ण आहे. जिल्ह्यात एकही व्हेंटिलेटरचा वापर केला न गेल्याने पालघरमधील आशादायक चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसावे, अशी आपण प्रार्थना करीत असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पालघर येथे सांगितले.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रथम डहाणू तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासोबत बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्ह्यातील आजाराची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत मृत्युदर कमी असून कोरोनाबाधितांच्या बरे होण्याच्या टक्केवारीबाबत समाधान व्यक्त केले. आरोग्य विभागाकडे ६० व्हेंटिलेटर असून एकाही व्हेंटिलेटरची गरज रुग्णाला भासली नसल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्ह्यात वसई, पालघर आदी दाटीवाटी असलेल्या भागात कोरोना संक्रमणाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आल्याने स्वच्छ हवामान, प्रदूषण-विरहित हवामानाचा यावर काय परिणाम होतो का? याबाबत अभ्यास करण्याच्या सूचना आपण दिल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. डायबेटीजचे रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडत असल्याचे मी मानत नाही, असे सांगून जिल्ह्यातील आशादायक असलेले चित्र आपल्या वृत्तपत्रात मांडा, असाही सल्ला आव्हाड यांनी या वेळी दिला.
पालघर मध्ये उभे राहात असलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या इमारतीची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या असून मी त्या विभागाचा मंत्री अथवा पालघरचा पालकमंत्री नसल्याचे सांगून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पालकमंत्री दादा भुसेंकडे अंगुलीनिर्देश केले. निकृष्ट दर्जाच्या इमारतीबाबत नामदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र दौरा करून या तक्रारींची शहानिशा करू, असे त्यांनी सांगितले.