Coronavirus : पालघरमध्ये तिसऱ्या दिवशीही बाजारपेठा पडल्या ओस, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी व्यापारी, नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 01:18 AM2020-03-21T01:18:50+5:302020-03-21T01:19:15+5:30
कोेरोना प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य पातळीवर खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असून जिल्ह्यातील पर्यटनस्थळ, धार्मिकस्थळे, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पालघर/तलासरी : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करत नगर पंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महापालिका आदी क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा असलेली दुकाने वगळता गर्दी होणारी ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे गेल्या दोन दिवसांपासूनच जिल्ह्यातील अनेक बाजारपेठा बंद ठेवल्या गेल्या आहेत. शुक्रवारीही अनेक बाजारपेठा बंद असल्याचे दिसून आले.
. जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या बाजारपेठा गेल्या दोन दिवसांपासून बंद होऊ लागलेल्या आहेत. दरम्यान, तलासरी नगरपंचायतीमार्फत संपूर्ण बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा असलेली दुकाने वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने, बीअर, वाईन शॉप बुधवारी सकाळपासून बंद केली असून, ३१ मार्चपर्यंत ती बंद राहणार आहेत.
कोेरोना प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य पातळीवर खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असून जिल्ह्यातील पर्यटनस्थळ, धार्मिकस्थळे, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने तलासरी नगरपंचायत हद्दीतील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. बाजारपेठ बंद ठेवल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. दुकाने बंद असल्याने दुर्गम डोंगरी भागातून येणाºया ग्राहकांना त्रास सोसावा लागत आहे, तर व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
पालिका अधिका-यांवर जबाबदा-या
पारोळ : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वसई-विरार पालिकेच्या अधिकाºयांवर महत्त्वाच्या जबाबदाºया सोपवण्यात आल्या आहेत. नगररचना विभागाचे उपसंचालक वाय.के. रेड्डी यांच्याकडे ‘कोरोना’संदर्भतील सर्व माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच संबंधित यंत्रणांकडे सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
अधिनस्त मेडिकल/पॅरा मेडिकल रुग्णांच्या संपर्कात राहून नव्या रुग्णांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय व आरोग्य यंत्रणांकडे सुपूर्द करणे, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित होणाºया आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करणे, याकामी अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव, प्रभारी सहआयुक्त विश्वनाथ तळेकर हे रेड्डी यांना मदतनीस म्हणून काम पाहतील. कोरोना आपत्कालीन तक्रार निवारण कक्ष दिवाणमान वसई अंतर्गत एकूण पाच अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली असून या अधिकाºयांशी आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता येणार आहे.
कोरोनाबाधित देशातून अथवा परदेश प्रवास करून आलेल्या प्रवाशांची माहिती घेणे व पुढील उचित कार्यवाहीसाठी खास पथकाची स्थापना करण्यात आली असून यात डॉ. तबस्सूम काझी, डॉ. स्मिता वाघमारे, सुषमा संख्ये, नमिता राऊत, नीलिमा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लग्न समारंभात सहभागी होऊ नका
आगामी काळात जिल्ह्यात अनेक ठिकाणी लग्न समारंभ होणार असल्याने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अशा समारंभांमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे. ज्यांच्याकडे लग्ने ठरली आहेत त्यांनी शक्य झाल्यास लग्न समारंभ पुढे ढकलण्याचे आवाहन करत जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या सभा, बैठका, प्रशिक्षण घेण्यात येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.
तुंगारेश्वर : परशुराम कुंड, मंदिर बंद
वसई : ‘कोरोना’ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयाला अनुसरून तुंगारेश्वर येथील आश्रम संस्थेने आश्रमातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून येथील मंदिर काही दिवस बंद ठेवण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे तुंगारेश्वर येथील प्रसिद्ध महादेवाचे मंदिरदेखील दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी या सूचनेचे पालन करून ‘कोरोना’ व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन बालयोगी श्रीसदानंद महाराज आश्रम संस्थेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे
केले आहे.
गुढीपाडव्यानिमित्त आश्रमात परशुरामकुंड येथे होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच सर्व उत्सव व कार्यक्र म देखील स्थगित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभाही ३१ मार्चनंतर शासनाच्या धोरणाचा आढावा घेऊन नंतर तारीख जाहीर करण्यात येईल, असे विश्वस्तांनी सांगितले.