CoronaVirus वसई-नालासोपाऱ्यात गर्भवती महिलेसह दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 06:10 AM2020-04-07T06:10:35+5:302020-04-07T06:10:45+5:30
ज्येष्ठ नागरिकाने गमावले प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई/नालासोपारा : वसईमधील एका कोरोनाग्रस्त ज्येष्ठ नागरिकाचा तसेच एका गर्भवती महिलेचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चार झाली असून वसई-नालासोपारामध्ये तीन जणांनी आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १७ झाली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील एका ३८ वर्षीय गर्भवती महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याने तिला उपचारासाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेचा ४ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच वसईतील कोरोनाग्रस्त ज्येष्ठ नागरिक रुग्णाचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. वसईच्या ओमनगर भागात वास्तव्यास असलेल्या या ६५ वर्षीय रुग्णावर पाच दिवसांपासून नालासोपारास्थित एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले. वसई-नालासोपारा परिसरात कोरोनाग्रस्त तीन रुग्णांचे बळी गेल्यामुळे आरोग्य यंत्रणा व पोलिसांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सोमवारी मृत्यू पावलेला रुग्ण मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करीत होता. त्याचे मुंबईत डायलिसीसही सुरू होते, परंतु लॉकडाऊननंतर त्या रुग्णाने नालासोपारा येथे डायलिसीस करण्याचे ठरविले. मात्र खबरदारी म्हणून या रुग्णांची कोविड-१९ ची वैद्यकीय तपासणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर दोन दिवसांपूर्वी या रुग्णाची प्रकृती बिघडली आणि सोमवारी पहाटे या रुग्णाचा हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाल्याची माहिती महापौरांनी दिली.
पालकमंत्री दादा भुसेंनी घेतली आढावा बैठक
वसई, विरार, नालासोपारा परिसरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी दुपारी आढावा बैठक घेतली. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात चार बळी गेल्यानंतर कोरोनाविषयी पहिलीच आढावा बैठक घेतली हे विशेष. या आढावा बैठकीदरम्यान त्यांनी वसई-विरार महापालिका प्रशासन व त्यांच्या आरोग्य यंत्रणेचे सर्व डॉक्टर व अधिकारीवर्ग यांची ही भेट घेऊन माहिती व उपाययोजना जाणून घेतल्या.