coronavirus: विरारमध्ये एक हजार खाटांचे विलगीकरण केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 01:52 AM2020-07-10T01:52:01+5:302020-07-10T01:52:44+5:30
या संकटाच्या काळात एकत्रित येऊन आपण सर्व जण लढा देणे आवश्यक आहे. केवळ विद्यादान नाही तर आता आरोग्यदानही आपण करीत असल्याचे आ. क्षितिज ठाकूर यांनी स्पष्ट केले.
- आशीष राणे
वसई : विरारस्थित विवा महाविद्यालय, विरार पूर्वेस असलेल्या शिरगाव येथे अतिजोखमीच्या रुग्णांसाठी एक हजार खाटांचे विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या विलगीकरण केंद्राचे उद्घाटन नुकतेच बविआचे नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ. राजेश पाटील, वसई-विरार पालिका आयुक्त गंगाथरन डी., माजी नगरसेवक पंकज ठाकूर, महेश पाटील, जितुभाई शहा व इतर मान्यवर उपस्थित होते.
आ. हितेंद्र ठाकूर यांनी महानगरपालिकेला स्वत:हून आपले नवीन विवा कॉलेज परदेशातून आलेल्यांसाठी दिले, तर वसई पूर्वेस असलेले शिरगाव येथील कॉलेज हेदेखील अतिजोखमीच्या बाधित रुग्ण व लहान घरांतील लोकांसाठी दिले. विशेष म्हणजे विवाच्या या दोन्ही आणि सर्वच विलगीकरण केंद्रांना जीवदानी मंदिर ट्रस्ट यांच्याकडून नाश्ता, दोन वेळच्या भोजनाची मोफत व्यवस्थाही करण्यात आली आहे. गरम पाण्याच्या किटल्या, वाफ घेण्यासाठी स्टिमरही या केंद्रांमध्ये पुरविले गेले आहेत. डॉक्टर, नर्स, कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या खाण्यापिण्याचीदेखील सुविधा या ठिकाणी विनामूल्य सुरू करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, या संकटाच्या काळात एकत्रित येऊन आपण सर्व जण लढा देणे आवश्यक आहे. केवळ विद्यादान नाही तर आता आरोग्यदानही आपण करीत असल्याचे आ. क्षितिज ठाकूर यांनी स्पष्ट केले.