Coronavirus : ‘जनता कर्फ्यू’साठी सज्ज, जिल्ह्यातील ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 04:08 AM2020-03-22T04:08:43+5:302020-03-22T04:08:53+5:30
Coronavirus : रविवारी घरातच बसून राहता यावे यासाठी महिला वर्गाने शनिवार सकाळपासून भाजीपाला, किराणा मालाची खरेदी करण्यासाठी बाजारपेठ गाठली होती.
- हितेन नाईक
पालघर : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे इटली, चीन आदी देशात गेलेल्या बळींची संख्या पाहता आपल्या देशात या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत एक दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’ आवाहनाला जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविवारी घरातच बसून राहता यावे यासाठी महिला वर्गाने शनिवार सकाळपासून भाजीपाला, किराणा मालाची खरेदी करण्यासाठी बाजारपेठ गाठली होती.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासोबतच आरोग्य अधिकारी-कर्मचारी, पोलीस मोठ्या हिमतीने काम करीत असून आपल्या जीवाची कुठलीही तमा न बाळगता हे लोक दिवस-रात्र एक करीत आहेत. मनाई आदेशाच्या विरोधात सुरुवातीला काही काळ लोकांचा तक्रारींचा सूर असला तरी या कोरोनाच्या प्रादुर्भावाचे दुष्परिणाम भावी पिढीला भोगावे लागू नये म्हणून गर्दी टाळणे, स्वच्छता राखणे, सहप्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शनपर सूचनांचे पालन करण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या विषाणूच्या पसरण्याची व्याप्ती वाढू नये, लोकांचा एकमेकांशी संपर्कवाढून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी एक दिवसीय कर्फ्यूचे आयोजन उद्या (रविवारी) सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत करीत कोणीही घराच्या बाहेर पडू नये या आवाहनाला गाव-पाड्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
व्हाट्स अॅप, फेसबुक आदी माध्यमातून रविवारी संपूर्ण दिवस घरीच राहण्याची भूमिका तरुण वर्गासह कुटुंबीयांनी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण दिवस स्वत:ला घरात बंदिस्त करताना खाण्या-पिण्याची, जेवणाची आदी वस्तू जमविण्यासाठी महिलांनी सकाळी बाजारपेठेत धाव घेत आपल्या वस्तूंची खरेदी केली.
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी जनता कर्फ्यू पाळण्याच्या आवाहनाचे बोर्ड गावागावात लावण्यात आले असून कर्फ्यूच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ग्रामस्थांनी आपल्या दारात उभे राहून पोलीस, डॉक्टर, आरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स तसेच अत्यावश्यक सेवेत सहभागी असलेल्याच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या वाजवून, थाळी अथवा अन्य वाद्य वाजविण्याचे आवाहन सरपंचच्या वतीने करण्यात आले आहे तर दुसरीकडे आपल्या गावात येणाऱ्या पर्यटकांना, फेरीवाले, बाहेर गावच्या व्यक्तीमार्फत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मार्चपर्यंत गाव बंदी घालण्यात आली आहे. अशी बाहेरून एखादी व्यक्ती गावात आल्यास विनंती पूर्वक त्यांना आपल्या घरी जाण्याची विनंती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानामुळे सर्वत्र वसई तालुक्यात जनता कर्फ्यू असणार आहे. यावेळी सातही पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त असणार आहे. जर कोणी रस्त्यावर दिसले तर त्याची चौकशी केली जाईल. अतिआवश्यक सेवा उघड्या असल्याने कोणी दवाखान्यात, हॉस्पिटल किंवा मेडिकल या ठिकाणी औषधोपचार करण्यासाठी जातील.
- विजयकांत सागर
(अप्पर पोलीस अधीक्षक, वसई)
कोरोना विषाणूची दहशत आज संपूर्ण जग उपभोगत आहे. अशावेळी आपल्या गावातील नागरिकांच्या स्वास्थ्याची जबाबदारी घेण्यासाठी हा प्रयत्न ग्रामपंचायत करीत आहे.
- राकेश तरे, सरपंच मुरबे