CoronaVirus: जिल्ह्यातील तीन रुग्णालयांतील रुग्णांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:07 AM2020-04-24T00:07:49+5:302020-04-24T00:07:58+5:30

८० जणांचे अहवाल नकारात्मक; जुचंद्रमधील माता-बालसंगोपन केंद्रातील रूग्णांमध्ये समाधान

CoronaVirus: Relief to patients in three hospitals in the district | CoronaVirus: जिल्ह्यातील तीन रुग्णालयांतील रुग्णांना दिलासा

CoronaVirus: जिल्ह्यातील तीन रुग्णालयांतील रुग्णांना दिलासा

Next

पारोळ/कासा : पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील सर डी.एम. पेटिट रुग्णालय, जुचंद्र येथील माता बाल संगोपन केंद्र आणि कासा येथील उपजिल्हा रुग्णालये काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे सील करण्यात आली होती. मात्र आता या तीनही रुग्णालयांतील बहुतांश रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे ‘क्वारंटाईन’ करण्यात आलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

वसई-विरार महापालिका हद्दीतील दोन रुग्णालये कोरोना रुग्णांमुळे सील करण्यात आली आहेत. केवळ महापालिकेच्या व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळे जूचंद्र येथील माता बाल संगोपन केंद्रातील ७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यात ४ दिवसांच्या लहान बाळाचाही समावेश आहे. रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारी व रुग्णांना विषाणूची लागण झाल्यानंतर येथील आयसोलेशन कक्षातील ८० जणांचे अहवाल तपासणीनंतर नकारात्मक आले आहेत. तर अद्याप ५ जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. ८० जणांचे अहवाल नकारात्मक आल्याने जूचंद्रकरांना दिलासा मिळाला आहे.

वसई पश्चिमेतील सर डी.एम. पेटीट रुग्णालयात ५ वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे हे रु ग्णालय सील करण्यात आले होते. त्यापाठोपाठ नायगाव पूर्वेतील माता बाल संगोपन केंद्रातील ७ जणांना कोरोनाची लागण झाली. ७ जणांना लागण झाल्यानंतर आधीच आयसोलेशन कक्षासाठी विरोध असलेल्या जुचंद्र ग्रामस्थांनी यावरून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाला जबाबदार ठरविले होते.

कासा रुग्णालयातील ३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह
कासा : डहाणू तालुक्यातील कासा उपजिल्हा रुग्णालयात क्वारंटाइन केलेल्यांचे कोरोना चाचणी अहवाल दिलासादायक आले असून उर्वरित ३७ जणांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कासा उपजिल्हा रुग्णालयात आंतरवासिता (इंटर्न) म्हणून काम करणाऱ्या दोन डॉक्टरना कोरोना संसर्ग झाला होता. त्यांच्या संपर्कातील १५० जणांचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. त्यातील १४९ सहवासितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सारणी येथील कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २६ वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उर्वरित ३७ सहवासितांचे अहवाल प्राप्त झाले नव्हते, मात्र सदर अहवाल बुधवारी प्राप्त झाले असून सर्वांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सर्व निगेटिव्ह अहवाल आलेल्या १८६ जणांना शिक्के मारून ‘होम क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. दरम्यान, कासा रुग्णालयात गंजाड येथील तीन वर्षीय कोरोनाबाधित मुलीच्या संपर्कात आल्याने दोन डॉक्टरना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कासा रुग्णालय सील करून येथील डॉक्टर, कर्मचारी, उपचार घेत असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक असे एकूण १८७ जणांना रुग्णालयातच १६ एप्रिलला क्वारंटाइन केले होते.
 

Web Title: CoronaVirus: Relief to patients in three hospitals in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.