CoronaVirus: आयडियाची कल्पना! संसर्ग टाळण्यासाठी सोसायटीनं शोधला अनोखा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 05:18 PM2020-03-28T17:18:07+5:302020-03-28T17:22:23+5:30
कोरोनाला रोखण्यासाठी, गर्दी टाळण्यासाठी सोसायटीनं शोधली शक्कल
- प्रतिक ठाकुर
वसई–विरार शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत असताना, शहरातील काही सोसायट्यांनीसुद्धा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले आहेत. विरारच्या एका सोसायटीमध्ये चक्क एका भाजी विक्रेत्याने बस्तान मांडले होते. विशेष म्हणजे रहिवाशांच्या संमतीने हा भाजी विक्रेता सोसायटीत बसला होता. रस्त्यावर व भाजी मार्केटमध्ये होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भाजी विक्रेत्याला सोसायटीत बसण्यास परवानगी दिली.
कोरोना विषाणूमुळे राज्य व जिल्हा प्रशासनाकडून शहर लॉकडाऊन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जीवनावस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व बंद करण्यात आले. मात्र तरीदेखील दररोज नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर व भाजी मार्केटमध्ये गर्दी करतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती होती. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विरार पश्चिमेच्या विनय युनिक रेसिडेन्सी या इमारतीच्या रहिवाशांनी सोसायटीत एका भाजी विक्रेत्याला भाजी विक्रीसाठी जागा दिली. त्यानुसार हा भाजीवाला रोज सोसायटीत दोन तास भाजी विक्री करतो. या भाजी विक्रेत्याकडे नागरिक भाजीसाठी गर्दी न करता, एकमेकांमध्ये काही अंतर ठेवून खरेदी करत आहेत.
या सोसायटीत सहा इमारती आहेत. या सहामधील एका इमारतीत शंभर घरे अशी एकूण ६०० कुटुंब राहतात. ही ६०० कुटुंब जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडल्यास रस्त्यांवर व भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दीही होईल. या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोसायटीच्या रहिवाशांनी यावर विचार करून एका भाजी विक्रेत्याला सोसायटीत भाजी विक्रीसाठी आमंत्रण दिले. त्यामुळे आता दररोज हे रहिवासी आपल्या सोसायटीतच सोयीप्रमाणे गर्दी न करता भाजी खरेदी करत आहेत. या उपक्रमामुळे ही ६०० कुटुंब फारशी सोसायटीबाहेर पडत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्गही काही प्रमाणात रोखता जात आहेत. इतर सोसायट्यांनी या उपक्रमाचे अनुकरण केल्यास नक्कीच शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे.
आमच्या सोसायटीत सहा इमारती असून यामध्ये सहाशे कुटुंब राहत आहेत. हे सर्व सोसायटीचे रहिवाशी भाजी खरेदीसाठी भाजी मार्केटमध्ये जात होते. मात्र आधीच मार्केटमध्ये नागरिकांची मोठी गर्दी असायची. त्यामुळे भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दी झाल्यास कोरोनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आम्ही भाजी विक्रेत्याला सोसायटीत बोलावून घेतले. आता सोसायटीचे रहिवासी बाहेर न जाता सोसायटीतच भाजी विक्री करत आहेत. त्यामुळे अशाप्रकारे आम्ही कोरोनाचा संसर्ग टाळत आहोत.
विनोद सावंत, सोसायटी सेक्रेटरी