coronavirus: महाराष्ट्र-गुजरात सीमाभागातील गावे स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन, वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे गावांमध्ये नियमांचे बंधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 02:07 AM2020-07-08T02:07:04+5:302020-07-08T02:08:06+5:30
जुलैच्या प्रारंभीच गुजरात औद्योगिक वसाहतीत जाणाºया बोर्डीतल्या कामगाराला कोरोनाची लागण झाली. सीमाभागातील या पहिल्या रुग्णानंतर रामपूर आणि चिखले गावात प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली.
- अनिरुद्ध पाटील
बोर्डी : महाराष्ट्र-गुजरात सीमाभागात कोरोना रुग्ण वाढल्याने त्याचा फैलाव रोखण्यासाठी विविध ग्रामपंचायतींनी स्वयंस्फूर्तीने गावांत नियमांचे बंधन घातले आहे. त्यानुसार सकाळी ठरावीक वेळेत, निर्बंधांसह नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीची सूट दिली आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाईबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
डहाणू तालुक्यातील पहिला कोरोना रुग्ण डोंगरी भागातल्या गंजाड गावातल्या तीन वर्षीय मुलीच्या माध्यमातून नोंदवला गेला. त्यानंतर कासा आणि रानशेत येथेही रुग्णसंख्या आढळली. डहाणू नगरपालिका क्षेत्रातील सतीपाडा येथे सागरी भागातला पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर नरपड, वाढवण येथे अन्य रुग्ण नोंदविले गेले. तर डहाणू शहरातील पतीच्या आत्महत्येच्या आरोपावरून अटक पत्नी आणि तिच्या प्रियकरामार्फत संसर्ग होऊन अनेक पोलिसांना बाधा झाली. मात्र तालुक्यातील सीमाभागातल्या गावांमध्ये एकही रुग्ण नव्हता.
जुलैच्या प्रारंभीच गुजरात औद्योगिक वसाहतीत जाणाºया बोर्डीतल्या कामगाराला कोरोनाची लागण झाली. सीमाभागातील या पहिल्या रुग्णानंतर रामपूर आणि चिखले गावात प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली. त्यांच्या सान्निध्यातील शंभर जणांना क्वारंटाइन करण्याची वेळ आल्यावर, बोर्डी गावातील ही संख्या ७०च्या घरात असल्याने, विश्रामधाम येथे नव्या संस्थात्मक विलगीकरण कक्षाची उभारणी करावी लागली. एकीकडे प्रतिबंधित क्षेत्राच्या निर्मितीत प्रशासन व्यस्त असताना बोर्डी, रामपूर आणि चिखले ग्रामपंचायतीने स्वयंस्फूर्तीने गावांत लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे लागू करण्याचा लागलीच ठराव घेतला. त्यानुसार सकाळच्या सत्रात ठरावीक काळासाठी काही निर्बंध लागू करून दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. त्या वेळेनंतर नियमबाह्य दुकाने उघडणाºयावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
डबल सीट प्रवाशांवर कारवाई करा
जुलैच्या प्रारंभीच बारडा यात्रेला भक्तांनी जाऊ नये म्हणून, स्वयंशिस्तीसाठी अस्वाली आणि जांबुगाव ग्रामपंचायतीने बंद लागू केला होता. त्यामुळे सीमाभागात उशिरा का होईना कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रारंभ झाला हे सकारात्मक लक्षण आहे.
फक्त दुचाकींवर डबल सीट तर चारचाकीत गर्दी करून फिरणाऱ्यांवर कारवाईसह विनापरवाना वाहनचालकांविरुद्ध आरटीओ आणि पोलिसांनी मोहीम उघडणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.