coronavirus : मायदेशी परतण्याची व्यवस्था करा! यूकेत शिकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची सरकारला साद!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 01:54 PM2020-03-28T13:54:46+5:302020-03-28T13:56:02+5:30
युकेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याची मायदेशी माघारी येण्याची धडपड सुरू झाली आहे.त्यांच्यासह तेथे देशातील अन्य सुमारे पन्नास विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
- अनिरुद्ध पाटील
बोर्डी - यूके येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने तेथे शिकण्याकरिता गेलेल्या पालघर जिल्हयाच्या डहाणू तालुक्यातील विद्यार्थ्याची मायदेशी माघारी येण्याची धडपड सुरू झाली आहे.त्यांच्यासह तेथे देशातील अन्य सुमारे पन्नास विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र विमान सेवा ठप्प झाल्याने परतीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. प्रत्येक दिवस दहशतीखाली जगत असून, जीवाला धोका वाढल्याने शासनाने माघारी परतण्याची तत्काळ व्यवस्था करावी अशी विनवणी त्यांनी केली आहे.
डहाणूतील निकेत धांगकर(वय,29, डहाणू शहर) हा विद्यार्थी गतवर्षी सप्टेंबर मध्ये शिप ऑफिसरच्या अभ्यासक्रमासाठी युके येथे गेला होता. या कोर्सच्या शेवटच्या टप्प्यात तेथे कोरोनाचा प्रभाव वाढल्याने तेथील प्रशासनाने 31 जुलैपर्यंत कॉलेज बंद केले आहे. तर प्रेसिडेंट आणि राणीला या आजाराची लागण झाल्याने सामान्यांची स्थिती भयावह होऊन सर्वांचे अवसान गळले आहे. रोज नवनवीन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते आहे. साऊथ हॅमटन येथे सेल्फ कोरनटाईन असलेल्या मुंबईतील सत्तावीसजणांसह देशभरातल्या विविध राज्यातल्या सुमारे पन्नास विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. परिस्थिती आटोक्याबाहेर जात असताना या विद्यार्थ्यांनी मायदेशी परतण्यासाठी आरक्षित केलेली विमानांची तिकीट रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे स्वतः प्रमाणेच मायदेशी कुटुंबीय आणि नातेवाईकांची परिस्थिती दयनिय बनली आहे. देशात लॉक डाऊन असून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवा आणि अन्य सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केल्याने पेच अधिकच वाढला आहे.
दरम्यान राज्य आणि केंद्र शासनाने विशेष विमानाची व्यवस्था करून सर्वांना मायदेशी परत बोलविण्याची तत्काळ व्यवस्था करावी अशी विनंती या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाद्वारे व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.