Coronavirus : दुबईवरून आलेले ‘ते’ सहा जण देखरेखीखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:36 AM2020-03-15T00:36:42+5:302020-03-15T00:37:46+5:30
दहा दिवसांपूर्वी दुबई येथे फिरण्यासाठी गेलेले सहा पालघरवासीय नागरिक शहरात आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला समजताच डॉ. सागर पाटील, आरोग्य सेवक, सहाय्यक डॉक्टर यांच्या पथकाने शुक्रवारपासून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
पालघर : पालघर शहरात दहा दिवसांपूर्वी दुबईवरून आलेल्या एकूण सहा नागरिकांचा शोध घेण्यात आरोग्य यंत्रणेला आज उशिराने यश आले असून त्यांची तपासणी करून त्यांना आपल्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये ताप, खोकला, सर्दीसारखी लक्षणे आढळली असून, त्यांच्या रक्ताचे नमुने उद्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
दहा दिवसांपूर्वी दुबई येथे फिरण्यासाठी गेलेले सहा पालघरवासीय नागरिक शहरात आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला समजताच डॉ. सागर पाटील, आरोग्य सेवक, सहाय्यक डॉक्टर यांच्या पथकाने शुक्रवारपासून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. डॉ. पाटकर गल्लीत त्यातील एक व्यक्ती सापडल्यानंतर त्यांच्या तपासणीत कोरोनाबाबत कुठलीही लक्षणे आढळून आली नव्हती. त्यांच्या घरातील अन्य सर्व लोकांची तपासणी या वेळी आरोग्य विभागाकडून करण्यात आली. त्या व्यक्तीसोबत अन्य ६ ते ७ लोक दुबईवरून पालघरमध्ये आल्याची माहिती कळल्यानंतर त्यांचा पत्ता माहीत नसल्याने त्यांचा शोध घेत त्यांच्या तपासणीचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले होते. शेवटी डॉ. सागर पाटील आणि त्यांच्या पथकाने दुबईवरून आलेल्या अन्य पाच लोकांचा शोध घेण्यास यश मिळविले. त्यांच्या तपासणीदरम्यान त्यांच्यात ताप, खोकला, सर्दी आदी लक्षणे आढळून आली असून त्यांच्या रक्ताचे नमुने ग्रामीण रुग्णालयात घेऊन ते तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना कोरोना विषाणूची लागण झाले की नाही हे नक्की होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.
जिल्ह्यातून वाडा येथील दोन रुग्णांपैकी एका रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यांच्यात कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणे दिसून आली नसल्याचा (निगेटिव्ह) अहवाल प्राप्त झाल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकल्याची माहिती डॉ.पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवरून काम करीत असून डोळ्यात तेल घालून परदेशातून आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे देशात आलेले परदेशी नागरिक आणि स्थानिक लोकांनी याची माहिती न लपविता आरोग्य यंत्रणेला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवरून काम करीत असून डोळ्यात तेल घालून परदेशातून आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे देशात आलेले परदेशी नागरिक आणि स्थानिक लोकांनी याची माहिती न लपविता आरोग्य यंत्रणेला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.