CoronaVirus: तीन वर्षांच्या चिमुकलीने केली कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 05:04 AM2020-04-27T05:04:00+5:302020-04-27T05:04:22+5:30
या वेळी तिच्यावर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून तिला आनंदी वातावरणात निरोप दिला.
कासा/डहाणू : डहाणू तालुक्यातील पहिली कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली गंजाड येथील तीन वर्षीय मुलगी कोरोनामुक्त झाल्याने रविवारी तिला घरी सोडण्यात आले. या वेळी तिच्यावर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून तिला आनंदी वातावरणात निरोप दिला. तालुक्यातील हा पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून या मुलीची नोंद झाली होती.
गंजाड गावच्या दसरापाडा येथील कातकरी कुटुंबातील ही तीन वर्षीय मुलगी कोरोनामुक्त झाल्याने रविवारी तिला घरी सोडण्यात आले. उपस्थितांनी टाळ्या वाजावून तिला निरोप दिला. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंगणे, सहायक जिल्हाधिकारी डॉ. सौरभ कटियार, तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी बी. एच. भारक्षे, तालुका वैद्यकीय अधिकारी संदीप गाढेकर आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, या चिमुकलीच्या आईवडिलांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे उघड झाले आहे. पालघर तालुक्यातील कटाळे गावच्या वीटभट्टीवर तिचे कुटुंबीय रोजगारासाठी स्थलांतरित झाले होते. मासवण, कासा उपजिल्हा रुग्णालय आणि त्यानंतर डहाणू उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, तिच्या सातव्या, तेराव्या आणि चौदाव्या दिवशी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला होता.
>७ जणांवर उपचार सुरू
तिच्या संपर्कात आलेल्या २२४ पैकी ७ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.