Coronavirus: दुसऱ्या लाटेच्या भीतीने ट्रॅव्हल्सचे चाक पंक्चर?; मालक-चालकांमध्ये चिंता, व्यवसाय बुडण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 12:30 AM2021-03-22T00:30:28+5:302021-03-22T00:30:51+5:30
कोरोनामुळे ट्रॅव्हल्सच्या वाहनांची चाके रुतली होती. एक पैशाचेही उत्पन्न मिळाले नाही, उलट खर्चाचा भार अधिक होत गेला. कर्जावर घेतलेल्या गाड्यांचे हप्ते थकले आहेत
सुनील घरत
पारोळ : कोरोना काळात काही महिने बंद असलेला पर्यटन व्यवसाय काही प्रमाणात सुरू झाला. लोकही बाहेर पडू लागले. यामुळे आपले चाक आता रुळावर आले असे ट्रॅव्हल व्यावसायिकांनाही वाटू लागले. बंद असलेला व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याने ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सर्व बसेस डागडुजी करून सज्ज केल्या; पण कोरोनाची दुसरी लाट आल्याने ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर होण्याच्या मार्गावर आहे.
कोरोनामुळे ट्रॅव्हल्सच्या वाहनांची चाके रुतली होती. एक पैशाचेही उत्पन्न मिळाले नाही, उलट खर्चाचा भार अधिक होत गेला. कर्जावर घेतलेल्या गाड्यांचे हप्ते थकले आहेत. बॅटऱ्या, टायर खराब झाल्याने दुरुस्तीचा खर्चही डोक्यावर बसला आहे. शिवाय या व्यवसायावर अवलंबून असलेले अनेक हात रिकामे झाले आहेत. टाळेबंदी उठावी, गाडी रस्त्यावर यावी, अशी अपेक्षा ट्रॅव्हल्स चालक-मालकांना आहे. २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. तेव्हापासून ३०० ट्रॅव्हल्सची चाके थांबली. चालक, वाहक, बुकिंग करणारे, प्रवाशांना आणणारे अशा व्यक्ती ट्रॅव्हल्सवर काम करतात. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ट्रॅव्हल्सवरच होता. आता ही सर्व कुटुंबे अडचणीत आली आहेत.
वसई, विरार, नालासोपारामध्ये २० ट्रॅव्हल्स चालक आहेत. त्यावर उदरनिर्वाह करणारी हजारो कुटुंबे आहेत. या ट्रॅव्हल्सची किंमत ४० ते ५० लाख आहे. काहींनी कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला आहे. कर्जाचा किमान मासिक हप्ता सव्वा लाख रुपये आहे. अनेक ट्रॅव्हल्स मालकांना कर्जाच्या हप्त्याची परतफेड करता आली नाही. वसुलीसाठी बँकांचा तगादा सुरू आहे. सध्या हा कर माफ केला आहे. ट्रॅव्हल्स सुरू झाल्यास नवीन कर भरावा लागेल. यासाठीही त्यांच्याकडे पैसा कमी पडणार आहे.
गाडी रुळावर येत होती; पण...
वसई, विरार, नालासोपारा, मनवेलपाडा येथून कोकणात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या मोठी आहे. खास करून गणपती, शिमगोत्सव यावेळी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर काही प्रमाणात ट्रॅव्हल्स सुरू झाल्याने गाडी रुळावर येत होती; पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीने व्यवसाय पुढे हा व्यवसाय चालवायचा की नाही, असा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकला आहे.
कोरोनामुळे हा व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. गाड्यांना भाडे मिळत नसल्याने बस खरेदी करताना घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे, हा प्रश्न आहे. - दिपेश घरत, ट्रॅव्हल व्यावसायिक
भीतीने बसमधील प्रवास टाळून लोकं स्वत:च्या वाहनाने प्रवास करतात. कोरोना प्रादुर्भावात पर्यटन व्यवसाय उभारी घेत नसल्याने आता पुढे काय करायचे, हा प्रश्न आहे. - शैलेश मराठे, टूर्स व्यावसायिक, विरार