coronavirus: तुंगारेश्वर तीर्थक्षेत्र श्रावणात भक्तजनांसाठी बंद, १०० वर्षांत प्रथमच भक्तीची परंपरा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 11:56 PM2020-07-04T23:56:54+5:302020-07-04T23:57:12+5:30
कोरोनाने वसई तालुक्यात थैमान घातले आहेत. सुमारे पाच हजारांच्या अधिक नागरिकांना या आजाराने ग्रासले असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यातील मंदिरे सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक दिसत नाही.
नालासोपारा : वसई तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले तुंगारेश्वर देवस्थान सध्या बंद आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा यासाठी येत्या श्रावण महिन्यातही ते बंदच ठेवावे, अशी मागणी मंदिर समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे १०० वर्षांत पहिल्यांदाच श्रावण महिन्यातही मंदिर बंद राहणार असल्याने भक्तीची परंपरा खंडित होणार आहे.
कोरोनाने वसई तालुक्यात थैमान घातले आहेत. सुमारे पाच हजारांच्या अधिक नागरिकांना या आजाराने ग्रासले असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यातील मंदिरे सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक दिसत नाही. वसईतील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले तुंगारेश्वर पर्वत सध्या पर्यटनासाठी आणि भाविकांना दर्शनासाठी खुले न करण्याची विनंती तुंगारेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीने जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या पत्रात तुंगारेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सध्यस्थितीत तुंगारेश्वर पर्वत भाविक व पर्यटकांसाठी खुले न करण्याचे सुचवले आहे. १८ मार्चपासून तुंगारेश्वर मंदिर बंद असून ६ जुलैपासून अन्य धर्मियांचा श्रावण सुरू होत आहे. तसेच मराठी महिन्यांप्रमाणे श्रावण मास २० जुलैपासून सुरू होत आहे. श्रावण महिन्यात तर प्रत्येक रविवार व सोमवारी श्री तुंगारेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी सुमारे १० ते १५ हजार भाविक येत असतात. तसेच पर्यटकसुद्धा येत असतात.
एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसे मंदिरात एकत्र आल्यास कोरोना अधिक पसरण्याची शक्यता आहे. याची जबाबदारी कोण घेणार? तसे होऊ नये म्हणून तुंगारेश्वर देवस्थान विश्वस्थ मंडळाने जिल्हाधिकाºयांना सध्याच्या आपत्ती काळात मंदिर खुले करू नये, असे आवाहन केले आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने तुंगारेश्वर पर्वत सध्या पर्यटक आणि भाविकांना दर्शनासाठी खुले न करण्याचे तुंगारेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीने जिल्हाधिकारी
डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे सांगितले आहे.
- पुरुषोत्तम पाटील,
अध्यक्ष, तुंगारेश्वर मंदिर व्यवस्थापन समिती