coronavirus: रुग्णवाहिकेतून पळाले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, दोघांवर गुन्हा दाखल, शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 05:22 AM2020-07-05T05:22:28+5:302020-07-05T05:22:59+5:30
नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी घेऊन आल्यावर हॉस्पिटलच्या बाहेरून पळून गेल्याचा ...
नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी घेऊन आल्यावर हॉस्पिटलच्या बाहेरून पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महानगरपालिकेच्या कार्यालय अधीक्षकांनी शुक्रवारी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
प्रगती नगर परिसरात राहणारे रहीमुनिसा मुमसाद खान (२८) आणि मुमसाद खान या दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना सांगितले. त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेले. हॉस्पिटल बाहेर रुग्णवाहिका उभी केल्यानंतर चालक पीपीई किट घालत असताना दोघेही पळून गेले. कार्यालय अधीक्षक सुदेश राठोड यांनी या घटनेची तक्रार शुक्रवारी वालीव पोलीस ठाण्यात दिली. पोलीस आरोपींच्या पत्त्यावर शोधण्यासाठी गेले असता ते मिळाले नाहीत.
वसई-विरारमध्ये २२४ नवे रुग्ण; दोन रुग्णांचा मृत्यू
वसई : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये शनिवारी दिवसभरात २२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर २७७ जणांनी या जीवघेण्या आजारावर मात केली आहे. त्याच वेळी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे आता पालिका हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या ५९५९ वर पोहचली आहे.
वसई-विरारमध्ये शनिवारी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आजवरच्या मृतांची संख्या १२६ झाली आहे. दिवसभरात २२४ रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे. तर दिवसभरात २७७ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २६६८ झाली आहे, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब ठरली आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेच्या दृष्टीने ही बाब चिंतेची ठरत असून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.