Coronavirus Updates: कोरोना विषाणूने केला होळीचा बेरंग; रंगांच्या खरेदीकडे पाठ, पिचकाऱ्यांचीही मागणी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 11:43 PM2021-03-27T23:43:36+5:302021-03-27T23:43:50+5:30
प्रशासनाकडून बंदी : वसई, विरार, नालासोपारा व ग्रामीण भागात दरवर्षी होळीसाठी लागणारा गुलाल, रंग, साखरगाठी, पिचकारी, इतर लागणाऱ्या वस्तूंनी बाजारपेठ फुलून जात असे.
पारोळ : होळी व धूलिवंदन हे दोन महत्त्वाचे सण पूर्ण देशात उत्साहात साजरे केले जातात. रंग, पिचकारी याशिवाय होळीचा उत्सव पूर्ण होत नाही. या सणाच्या काही दिवस आधीच बाजारात रंगांची दुकाने थाटली जातात. लहान मुलांचा कल पिचकारी खरेदीकडे असतो, पण या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तो रोखण्यासाठी प्रशासनाने सार्वजनिक होळी उत्सव साजरा करण्यास बंदी घातल्याने या वर्षी कोरोनामुळे होळीचा रंग बेरंग झाला आहे.
वसई, विरार, नालासोपारा व ग्रामीण भागात दरवर्षी होळीसाठी लागणारा गुलाल, रंग, साखरगाठी, पिचकारी, इतर लागणाऱ्या वस्तूंनी बाजारपेठ फुलून जात असे. मिठाई व थंडाई खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत असत. होळी सणात बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होत असे, तर रस्त्यांवर दुकाने लावत गरीब फेरीवाले यांनाही फायदा होत असे, पण या वर्षी प्रशासनाने हॉटेल, रिसॉर्ट, समुद्रकिनारे, बागबगिचे इत्यादी सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यास मनाई केल्याने ग्राहकांनी रंग खरेदीकडे पाठ फिरवली आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाल्याने घरीच कुटुंबासोबत होळी साजरी करण्याचा नागरिकांचा मानस आहे. या वर्षी रंग अंगाला लागला नाही तरी चालेल, पण कोरोनाची लागण व्हायला नको, असे नागरिकांचे मत आहे. संसर्गाचा फटका सर्वच सण, उत्सवांना बसला आहे.