CoronaVirus Vaccination : वसईत कोरोनाच्या लसीचा साठा संपला, महानगरपालिकेची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 12:07 AM2021-04-11T00:07:43+5:302021-04-11T00:08:09+5:30
CoronaVirus Vaccination : पालिकेने शहरात २३ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली, तर सात खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली.
नालासोपारा : वसई-विरार महापालिका हद्दीत १६ जानेवारीपासून कोविड प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली. मात्र मागील काही दिवसांपासून शहरांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, पालिकेच्या चिंता वाढली आहे, त्यात आता लस तुटवड्याच्या समस्येचा सामना पालिकेला करावा लागत आहे.
महापालिका हद्दीत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सना, त्यानंतर ६० वर्षांवरील व्यक्ती व ४५ ते ५९ वर्षे वयोगटांतील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना तसेच ०१ एप्रिलपासून ४५ वर्षे व त्यावरील सर्व व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणासाठी महापालिकेने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये व शासनाने निश्चित केलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू केलेली आहेत. पालिकेने मागील महिन्यातच शासनाकडे एक लाख लस उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते. दररोज स्मरणपत्र पाठवूनही शासनाने अजूनही मागणीनुसार लसीच्या कुप्प्यांचा पुरवठा होत नसल्याने पालिकेची मोठी तारांबळ उडाली आहे.
पालिकेने शहरात २३ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली, तर सात खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली. पण लसच उपलब्ध नसल्याने सर्वच केंद्रांवर लसीकरण संथ गतीने सुरू आहे. काही केंद्रांवर तात्पुरती स्थगिती दिली आहे. यामुळे पालिकेचा लसीकरणाचा कार्यक्रम लांबणीवर पडणार आहे.
महापालिकेला शासनामार्फत कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन असे दोन प्रकारच्या लसींचा टप्प्याटप्प्याने पुरवठा करण्यात आलेला आहे. परंतु सद्य:स्थितीत राज्यात लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे वसई-विरार शहर महापालिकेला लसींचा होणारा पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत पालिकेला पुरवण्यात आलेला लसींचा साठा संपल्यामुळे रविवार ११ एप्रिलपासून ते पुढील आदेश होईपर्यत पालिकेतील लसीकरण केंद्रांवर कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस तसेच कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात येणार नाही, मात्र पालिकेतील रिद्धिविनायक हॉस्पिटल, विजयवल्लभ हॉस्पिटल व कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटल येथील लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस सोमवारी १२ एप्रिलपासून देण्यात येणार आहे.
सध्या लसींचा साठा उपलब्ध नाही. आम्ही शासनाकडे वारंवार मागणी करत आहोत. मुख्य केंद्रातील साठा पूर्णतः संपला आहे. जशी लस उपलब्ध होईल तशी वितरित करणार आहोत.
- गणेश पाटील, जनसंपर्क अधिकारी, वसई-विरार, महानगरपालिका