coronavirus: वसई-विरारकरांची पाण्याची चिंता मिटली, धरणांत ४० टक्के पाणीसाठा,तीन महिने पुरेल इतका मुबलक साठा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 02:48 AM2020-05-11T02:48:07+5:302020-05-11T02:48:56+5:30

यंदा तर संपूर्ण जग व देशावर कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सतत हात धुण्याच्या केलेल्या आवाहनामुळे नागरिकांच्या पाणी वापरात गतवर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ झाली आहे. मात्र, मुबलक साठ्यामुळे आता ही चिंता मिटली आहे. 

coronavirus: Vasai-Virarkar's water worries allayed, 40 per cent water storage in dams | coronavirus: वसई-विरारकरांची पाण्याची चिंता मिटली, धरणांत ४० टक्के पाणीसाठा,तीन महिने पुरेल इतका मुबलक साठा

coronavirus: वसई-विरारकरांची पाण्याची चिंता मिटली, धरणांत ४० टक्के पाणीसाठा,तीन महिने पुरेल इतका मुबलक साठा

Next

- आशीष राणे 
वसई : पालघर जिल्ह्यातील एकमेव महापालिका असलेल्या वसई -विरार शहर हद्दीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या धामणी, उसगाव व पेल्हार या तीनही धरणांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याचा मुबलक व समाधानकारक साठा असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे.

एप्रिल-मे महिना उजाडला की धरणांची पाणी-पातळी खालावते आणि पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यंदा तर संपूर्ण जग व देशावर कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सतत हात धुण्याच्या केलेल्या आवाहनामुळे नागरिकांच्या पाणी वापरात गतवर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ झाली आहे. मात्र, मुबलक साठ्यामुळे आता ही चिंता मिटली आहे. 

वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव अशी चार शहरे व ग्रामीण भाग मिळून वसई-विरार महापालिका हद्दीत मोडतात. या चारही शहरांची किमान पुढील तीन महिन्यांसाठी काळजी मिटली आहे. मात्र तरीही कोरोनाचे संकट व सतत हात धुण्याने मुबलक साठा असूनदेखील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याची आवश्यकता आहे. पालघरसह वसई तालुक्यातील या तीन धरणांचा सरासरी एकूण साठा मिळून ३९.३७ टक्के इतका असल्याने जुलैअखेरपर्यंत किंवा त्याही पुढे वसईकर नागरिकांची पाण्याची मोठी चिंता मिटलेली असेल, असेही पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
वाढते नागरिकीकरण आणि त्या गरजेनुसार पाण्याचे नियोजन केले जात आहे. या प्रयोगात पालिका यंदाही बºयापैकी यशस्वी झाल्याने धरणात मुबलक साठा असल्याचे पाणीपुरवठा अभियंत्यांकडून सांगण्यात आले. वसई-विरार शहराला सूर्या-धामणी धरणातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा-३ मधून ५० एमएलडी तर उसगावमधून २० एमएलडी आणि पेल्हार मधून १० एमएलडी पाणी प्रतिदिन पुरवले जाते.

मागील वर्षी पाण्याची टंचाई थोडीफार भासली होती, मात्र जूनमध्ये पावसाला सुरुवात झाली आणि गतवर्षी जुलै-आॅगस्ट व सप्टेंबरनंतर देखील समाधानकारक पाऊस पडला होता. परंतु यंदाच्या वर्षी पालिकेने पाण्याचे उचित नियोजन केल्याने व अमृत योजनाही बºयापैकी कार्यान्वित झाल्याने या वेळी धरणात पाण्याचा साठा समाधानकारक आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बहुतांशी गंभीर स्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना अजूनही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

दररोज १८० एमएलडी पाणीपुरवठा
वसई-विरार शहराला मुख्यत: सूर्या प्रकल्प म्हणजेच धामणी, उसगाव आणि पेल्हार धरणांद्वारे पाणीपुरवठा होतो. मागील वर्षापासून विरार पूर्वेतील पापडखिंड धरण बंद केले. मात्र, त्याचा फार फरक पडणार नाही. त्यामुळे या मुख्य तीन धरणांतून अजूनही पुढील तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ म्हणजेच जुलैअखेरपर्यंत नियोजन पद्धतीने वसईतील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. वसई-विरार महापालिका दररोज या तीन धरणांतून १८० एमएलडी पाणी उचलते. हे पाणी विविध भागांतून मुख्य जलवाहिनीद्वारे नागरिकांना पोहोचवले जाते. दरम्यान, कडक उन्हाळ्यात जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागांत पाण्याची मोठी पंचाईत निर्माण होऊ लागली आहे.


तीन धरणांतील ८ मेपर्यंतची स्थिती

सूर्या व सूर्या टप्पा-३ म्हणजेच धामणी धरणातील सध्याचा पाण्याचा साठा १०८.७९१ घनमिलिमीटर इतका असून अद्याप एकूण ३९.३७ टक्के पाणी धरणात शिल्लक आहे. उसगाव धरणात १.५८७ घनमिलिमीटर म्हणजेच ३१.९९ टक्के इतका पाण्याचा साठा शिल्लक असून पेल्हार धरणात ०.६२२ घनमिलिमीटर म्हणजे १७.४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Web Title: coronavirus: Vasai-Virarkar's water worries allayed, 40 per cent water storage in dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.