CoronaVirus: भारत गॅसमुळे संपूर्ण गाव 'गॅस'वर; कोरोना होण्याच्या भीतीनं चिंतेत भर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 03:50 PM2020-04-07T15:50:35+5:302020-04-07T15:52:26+5:30
CoronaVirus: कंपनीतील कामगारांचा गावात वावर; ग्रामस्थ भयभीत
वाडा: वाडा तालुक्यातील हमरापूर गावाच्या हद्दीत 'भारत गॅस' ही कंपनी असून अत्यावश्यक सेवा म्हणून ही कंपनी सुरूच आहे.कंपनीत गॅस भरण्यासाठी बाहेरून टॅकर येत असून दुर्दैर्वाने वाहनचालकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास तो कामगारांना पर्यायाने ग्रामस्थांना होईल या भीतीने येथील ग्रामस्थांची झोप उडाली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन केले असून अत्यावश्यक सेवा असलेल्या कंपन्यांना सुरू राहण्याची मुभा देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने हमरापूर येथील भारत गॅस कंपनी सुरू आहे. या ठिकाणी गॅस भरण्यासाठी मुंबई ठाणे या शहरांतून तसेच बाहेरगावाहून टँकर येत असतात. या टँकरच्या वाहनचालकांना दुर्दैर्वाने कोरोना विषाणूची लागण झाल्यास पर्यायाने कामगार व नंतर ग्रामस्थांना संसर्ग होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
भारत गॅस या कंपनीतील सुमारे बारा कामगार हे हमरापूर गावात वास्तव्यास असून कंपनी सुटल्यानंतर ते गावात येऊन भाड्याने घेतलेल्या खोल्यांमध्ये राहतात. त्यांचा गावकऱ्यांशी दररोज संपर्क येत असून दुर्दैर्वाने एखाद्या कामगाराला संसर्ग झाल्यास त्याचा विपरित परिणाम गावावर होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कामगारांची कंपनीतच व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांनी कंपनी प्रशासनाकडे केली आहे.
ग्रामस्थांच्या मनात भीती
भारत गॅस ही कंपनी सुरू असून या कंपनीतील बारा कामगार आमच्या गावात वास्तव्यास आहेत. या कंपनीत मुंबई, ठाणे या शहरातून गॅस भरण्यासाठी टॅकर येत असून या वाहनातील चालकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास पर्यायाने कामगार व नंतर ग्रामस्थांना होऊ शकतो.त्यामुळे कामगारांना कंपनीत राहण्याची व्यवस्था करावी. - बाळू केणी, ग्रामस्थ