coronavirus: साेहळ्यांमधून काेराेनाच्या नियमांचे उल्लंघन, दुसऱ्या लाटेचा धाेका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 12:52 AM2020-12-09T00:52:11+5:302020-12-09T00:52:35+5:30
coronavirus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. त्यासाठी परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करणे, शहरी भागात चाचणीचे प्रमाण वाढवणे आणि काेरोना रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा अधिक क्षमतेने सक्रिय करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
वसई - काेरोनाची दुसरी लाट राेखण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असताना स्थानिक पातळीवर वसईमध्ये होणारे हळदी समारंभ, लग्नकार्य, वाढदिवस यांसारख्या सोहळ्यांमध्ये कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी परवानगीच्या क्षमतेहून सोहळ्यांच्या ठिकाणी वऱ्हाड्यांची झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. यामुळे दुसऱ्या लाटेची भीती वसईमध्ये खरी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र महापालिका, पाेलिसांकडून याकडे हाेत असलेल्या दुर्लक्षाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. त्यासाठी परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करणे, शहरी भागात चाचणीचे प्रमाण वाढवणे आणि काेरोना रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा अधिक क्षमतेने सक्रिय करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी कोरोनाबाबतच्या नियमावलीचे पालन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीबाबत नियमावली जाहीर केली आहे. सध्या लग्नसराईचा काळ सुरू असल्याने येत्या काळात विवाह सोहळ्याचे अनेक मुहूर्त आहेत. वसई-विरार, नालासोपारा आणि ग्रामीण भागांत अनेक हळदी समारंभ आणि विवाह सोहळे पार पडत आहेत. या कार्यक्रमांना माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत असून डीजे, नाचगाणी आणि जेवणावळीच्या कार्यक्रमात विनामास्क गर्दीत कोरोनाचे सुरक्षित अंतराचे सर्व नियम पायदळी तुडवले जात आहेत. जिल्हाभरात हीच स्थिती आहे. नागरिकांचे हे बेजबाबदार वर्तन असेच सुरू राहिल्यास ते कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. महापालिका व पोलीस आयुक्तालय प्रशासनाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने या कार्यक्रमांवर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
मिशन बिगीन अगेनमध्ये मंगल कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र, त्यांना काेराेनाच्या पार्श्वभूमीवर याेग्य खबरदारी घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. सर्वच ठिकाणी लक्ष ठेवणे शक्य नाही. मात्र शहरातील सभागृहांत गर्दीची मर्यादा पाळली जात नसेल वा त्यावर नियंत्रण ठेवले जात नसेल अथवा नियमाचे पालन होत नसेल तर हॉल मालक-चालक व आयोजकांवर नक्कीच कारवाई केली जाईल.
- डॉ. अश्विनी पाटील,
सहायक पोलीस आयुक्त, वसई परिमंडळ २