coronavirus: कोरोनामुळे घरातच उरकले शुभमंगल सावधान; मास्क घालून विवाह, आशीर्वाद आॅनलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 03:28 AM2020-05-15T03:28:17+5:302020-05-15T03:28:27+5:30
नाशिकच्या सर्वेश गोडबोले आणि पूजा खांबेकर यांचा विवाह पूर्वीच ठरला होता. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम २ मार्च रोजी पार पडला. दोन्ही कुटुंबीयांनी १२ मे ही लग्नाची तारीख निश्चित केली आणि लग्नासाठी मॅरेज लॉनही बुक करण्यात आले होते.
जव्हार : कोरोनामुळे अनेक वधू - वरांचा विवाह पुढे ढकलावा लागला. मात्र, मूळचे जव्हारचे आणि सध्या नाशिक, काठे गल्ली येथील राजन गोडबोले यांच्या मुलाचे शुभमंगल ठरलेल्या तारखेला घरातच करण्यात आले. या सोहळ्यादरम्यान वधू-वरांनी मास्क घातला होता.
नाशिकच्या सर्वेश गोडबोले आणि पूजा खांबेकर यांचा विवाह पूर्वीच ठरला होता. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम २ मार्च रोजी पार पडला. दोन्ही कुटुंबीयांनी १२ मे ही लग्नाची तारीख निश्चित केली आणि लग्नासाठी मॅरेज लॉनही बुक करण्यात आले होते. नातेवाइकांना व्हॉट्सअॅपद्वारे आमंत्रण दिले होते. दरम्यानच्या काळात लॉकडाउनची घोषणा झाली. पहिला, दुसरा, तिसरा असा लॉकडाउनचा कालावधी वाढतच गेल्याने नातेवाइकांनी विवाह सोहळा पुढे ढकलण्याचा सल्ला दिला होता. पण दोन्ही कुटुंबीयांनी घरातच विवाह पार पाडण्याचा निर्णय घेतल्याचे सर्वेशचे मामा हेमंत हंगेकर यांनी सांगितले.
ठरल्या तारखेला विवाह करण्याचे निश्चित झाल्यावर राजन गोडबोले यांनी नाशिक - मुंबईनाका पोलिसांना आॅनलाइन अर्ज केला, त्यात त्यांनी दोन लोकांची जाण्याची आणि दोन लोकांची येण्याची परवानगी देण्यात आली. लग्नाचे कपडे नसल्याने घरातच उपलब्ध असलेल्या कपड्यातच सर्वेश आणि वडील सोबत निघाले. राहता येथील खांबेकर कुटुंबातील पूजा, तिचे आई - वडील आणि भटजी अशा पाच जणांच्या उपस्थितीत खांबेकर कुटुंबाच्या राहत्या घरी हा सोहळा पार पडला. व्हिडीओ कॉलद्वारे २०० नातेवाइकांनी आशीर्वाद दिले.
लग्न साध्या पद्धतीने करण्याचा प्र्रस्ताव आम्ही मुलीच्या वडिलांसमोर ठेवला होता. त्यांनी ते मान्य केले. आणि मुलाचा लग्नसोहळा आनंदात पार पडला. पोलीस प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांच्या प्रयत्नाने आम्हाला पास उपलब्ध झाला. त्यांचे खूप आभार.
- राजन गोडबोले (मुलाचे वडील)