महानगरपालिकेने बजावल्या 299 गाळेधारकांना नोटिसा; उपायुक्तांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 11:50 PM2021-02-08T23:50:06+5:302021-02-08T23:50:17+5:30
परस्पर भाड्याने दिलेल्यांचे करार हाेणार रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : वसई-विरार महापालिकेने स्वयंरोजगाराला चालना मिळावी यासाठी पालिका क्षेत्रात व्यावसायिक गाळ्यांची निर्मिती करून नाममात्र भाडेतत्त्वावर नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी देण्यात आले होते. यातील काही गाळे नगर परिषद काळापासून आहेत. त्या गाळ्यांचे करार संपूनही पालिकेकडून नवे करार करण्यात आलेलेे नाहीत. तसेच अनेक गाळेधारकांनी अनेक वर्षांपासून हे नाममात्र शुल्कही भरलेले नाही. अशा २९९ गाळेधारकांस महापालिकेने कारवाईच्या नोटीस बजावल्या आहेत. तर केवळ सात हजार २६० रुपयांची वसुली केली आहे.
वसई विरार माहापालिकेतर्फे नऊ प्रभागांत ५२३ व्यावसायिक गाळे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आले आहेत. पण, पालिकेने या गाळ्यांकडे कधीही लक्ष दिले नाही. यामुळे अनेक वर्षांपासून या गाळ्यांचे मुदत करार संपूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तर ज्या व्यक्तीला हे गाळे देण्यात आले, त्याच व्यक्तीने या ठिकाणी व्यवसाय करणे अपेक्षित असताना अनेकांनी हे गाळे बिनदिक्कत भाडेतत्त्वावर दिले आहेत. नुकतेच पालिकेने या गाळ्यांचे सर्वेक्षण करून रेडीरेकनरनुसार त्यांच्या मासिक भाड्यात वाढ केली आहे. पण, या भाडेवाढीला गाळेधारकांनी विरोध दर्शविल्याने पालिकेने ही प्रक्रिया थांबवली आहे. इतरांना गाळे भाड्याने दिले आहेत, त्यांचे करार रद्द केले जाणार असल्याची माहिती उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी दिली आहे.