पालिकेचे निर्बिजीकरण केंद्र पुरेशा निधी अभावी बंद; 11 महिन्यांत 7948 जणांना कुत्र्यांचा चावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 09:33 PM2018-12-07T21:33:07+5:302018-12-07T21:33:34+5:30
श्वान दंश झालेल्यांपैकी केवळ मीरारोड परिसरातील रुग्णांची संख्या ३ हजार ५२१ इतकी असल्याचे उघड झाले आहे.
राजू काळे
भाईंदर - मीरा-भार्इंदर शहरात गेल्या जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत एकुण ७ हजार ९४८ जणांवर मोकाट श्वानांनी दंश केल्याने उपचार केल्याचे पशूवैद्यकीय विभागाने सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. तर या श्वानांवर उपचार करण्यासाठी व त्यांची पैदास नियंत्रणात आणण्यासाठी सुरु केलेले निर्बिजीकरण केंद्र गेल्या एक महिन्यापासून बंद झाल्याने शहरात मोकाट श्वानांची संख्या वाढू लागली आहे.
श्वान दंश झालेल्यांपैकी केवळ मीरारोड परिसरातील रुग्णांची संख्या ३ हजार ५२१ इतकी असल्याचे उघड झाले आहे. याखेरीज खाजगी रुग्णालयांत उपचार झालेल्या रुग्णांची आकडेवारी पशूवैद्यकीय विभागाकडे उपलब्ध नसल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेकदा पालिका रुग्णालयात श्वानदंशावरील लस उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. यासाठी जास्त रक्कम मोजून रुग्णांना उपचार करुन घ्यावे लागतात. गेल्या चार वर्षांत शहरात श्वान दंश झालेल्यांची संख्या एकुण २८ हजार ६७८ इतकी असल्याचे उघड झाले आहे. यात उत्तन आरोग्य केंद्रात ९९२ (जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान ३४२), भार्इंदर पश्चिमेसह विनायक नगर, गणेश देवल नगर आरोग्य केंद्रात एकुण ३ हजार ११४ (६०५) तर भारतरत्न स्व. पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात ३ हजार ७११ (१ हजार ९६८), भार्इंदर पूर्वेसह बंदरवाडी व नवघर आरोग्य केंद्रात एकुण २ हजार ५५० (४५४), मीरारोड आरोग्य केंद्रात १ हजार ५१० (३५५) तर भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात १३ हजार ८७ (३ हजार १६६), पेणकरपाडा आरोग्य केंद्रात १ हजार ५१३ (४१४) व काशीगाव आरोग्य केंद्रात २ हजार २०१ (६४४) रुग्णांना श्वानदंशावरील उपचार करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मोकाट श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने २००४ मध्ये उत्तन येथील शिरेगावात निर्बिजीकरण केंद्र सुरु केले. ते सुद्धा अनेकदा पुरेशा निधीअभावी बंद करण्यात येते तर काही वेळा कंत्राटदाराची मुदत संपुष्टात आल्याने ते बंद करण्यात येते. या बंद दरम्यान शहरात पुन्हा श्वानांची संख्या वाढल्याचे समोर आले होते. एक स्त्री-श्वान ७ ते ८ पिल्लांना जन्म देते. यावरुन शहरात निर्बिजीकरण केंद्र बंद झाल्यास श्वानांच्या संख्येत किती वाढ होते, याचा प्रत्यय येतो. हि संख्या प्रामुख्याने हिवाळ्यात वाढत असल्याचे एका अहवालातील नोंदीनुसार स्पष्ट झाले आहे. या वाढणाय््राा श्वानांच्या संख्येमुळे नागरीकांना श्वानांचा वावर असलेल्या निर्जनस्थळी ये-जा करणे धोक्याचे ठरत असल्याने त्यांचा वेळीच बंदोबस्त करुन निर्बिजीकरण केंद्र त्वरीत सुरु करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
प्रतिक्रिया :
काँग्रेस गटनेता जुबेर इनामदार : हि बाब नागरीकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने प्रशासनाने त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करणे आवश्यक होते. त्यासाठी प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी हात आखडता घेत यंदाच्या अंदाजपत्रकात केवळ २० लाखांचीच तरतूद केली. पुढील वर्षी होणाऱ्या महापौर चषक स्पर्धेसाठी मात्र १ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाचे आरोग्य अगोदर निरोगी ठेवणे प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य ठरत असताना स्पर्धेकरीता सत्ताधाऱ्यांची उधळपट्टी तर श्वान दंशाच्या उपचारासाठी अपुऱ्या निधीची तरतूद करणे संतापजनक आहे. पालिकेने त्वरीत पुरेसा निधी उपलब्ध करुन निर्बिजीकरण केंद्र सुरु करावे.
पालिकेचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम नरटले : पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने निर्बिजीकरण केंद्र बंद असुन निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पुर्नविनीयोजनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तत्पुर्वी कंत्राटदाराला श्वानांच्या उपचारास सुरुवात करण्याबाबत निर्देश दिले जाणार आहेत.