कॉरिडॉरचा मार्ग आता उन्नत, वस्तीवर वरवंटा फिरणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 12:30 AM2019-01-25T00:30:41+5:302019-01-25T00:31:08+5:30
विरार-आलिबाग कॉरिडॉरमुळे येथील औद्योगिक वसाहतीवर विस्थापित होण्याचे ढग आता निवळले असून, रेल्वेच्या बहुचर्चित विरार-आलिबाग कॉरिडॉरचा मार्ग आता बदलण्यात आला आहे.
वसई : विरार-आलिबाग कॉरिडॉरमुळे येथील औद्योगिक वसाहतीवर विस्थापित होण्याचे ढग आता निवळले असून, रेल्वेच्या बहुचर्चित विरार-आलिबाग कॉरिडॉरचा मार्ग आता बदलण्यात आला आहे. रेल्वेने पहिला नकाशा चुकीचा असल्याचे मान्य करून सुधारित नकाशा सादर केलाय नवीन नकाशानुसार हा कॉरिडॉर उन्नत मार्गाने जाणार असून एकही औद्योगिक कंपनी आणि निवासी घर विस्थापित होणार नाही. यामुळे वसईच्या औद्योगिक क्षेत्रात कमालीचा आनंद पसरला आहे.
रेल्वे तर्फेविरार ते पनवेल दरम्यान १२६ किलोमीटरचा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे ७ हजार कोटी असून तो २०२२-२३ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. मात्र, या प्रकल्पाचा ९ किलोमीटरचा मार्ग वसई पूर्वेतून जाणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या मार्गाचा नकाशा सादर करताना वसई पूर्वेतील भूमापन क्र मांक ३७ मधून हा मार्ग जाणार असल्याचे दाखवले होते. हा संपूर्ण पट्टा औद्योगिक क्षेत्राचा आहे. त्यामुळे येथील ७० टक्के उद्योग धंदे विस्थापित होण्याची भीती व्यक्त होत होती. या विरोधात तीव्र आंदोलन उभे राहू लागले होते. औद्योगिक वसाहतीत २५०० छोटे-मोठे उद्योग धंदे व ५०,००० कामगार काम करीत आहेत.
शिवसेनेने या प्रकरणी आवाज उठवला होता. तसेच, आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांना निवेदन देत औद्योगिक वसाहतीवर वरवंटा फिरवून हा प्रकल्प उभारू नये, म्हणून विनंती केली होती. वाढता जनक्षोभ पाहून वसईचे प्रांताधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाच्या कामास तात्पुरती स्थगिती दिली होती. अखेर मुंबई रेल्वे विकास महामंडळास ही चूक लक्षात आल्यावर त्यांनी सुधारित नकाशा सादर केला आहे.
>अशी जाणार मार्गिका: नवीन नकाशानुसार मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे उपमुख्य अभियंता खैरातीलाल पांचूराम मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार विरार-पनवेल कॉरिडॉर भूमापन क्र मांक २४, २७ (ब), ६३ (अ), ३३, ३८ अ, ३३ आणि ३२ तसेच रेल्वेच्याच जागेतून जाणार आहे. हे सर्व भूमापन क्र मांक अवघ्या काही गुंठ्यांचे आहेत.
>औद्योगिक वसाहतीत कमालीचा उत्साह
विरार आलिबाग कॉरिडॉर आपल्या मार्गातून जाणार नसल्याचे समजताच वसईच्या औद्योगिक क्षेत्रात जल्लोष करण्यात आला. मिठाई वाटण्यात आली. विस्थापित होण्याची टांगती तलवार जी डोक्यावर होती, ती निघून गेल्याचे उद्योजकांनी सांगितले. आमची औद्योगिक वसाहत यापुढे सुरळीत राहणार आहे, असे वसई इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष अनिल अंबर्डेकर यांनी सांगितले. प्रकल्प राबविताना यापुढे शासनाने स्थानिकांचे हित लक्षात घेऊन आणि चर्चा करून निर्णय घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.