‘मी वसईकर अभियान’ : वसईत भ्रष्ट पोलिसांची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:32 PM2019-07-29T23:32:55+5:302019-07-29T23:33:04+5:30
‘मी वसईकर अभियान’ : ११ कोटींच्या दफनभूमी घोटाळाप्रकरणी अनोखे आंदोलन
वसई : ११ कोटी रुपयांच्या दफनभूमीच्या कामात घोटाळा करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना पाठिशी घालणाºया माणिकपूर पोलिसांना दैवत मानून ‘मी वसईकर अभियाना’च्या शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी संध्याकाळी वसईच्या रस्त्यावरून टाळ - वाजंत्रीच्या गजरात पालघर पोलिसांच्या प्रतिमेची भव्य अशी पालखी मिरवणूक काढीत एक अनोखे आंदोलन केले.
यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वसई - विरार शहर महापालिकेने केलेल्या या दफनभूमी कामाच्या घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पालघर पोलीस अधीक्षक, वसई अप्पर पोलीस अधीक्षक, माणिकपूर पोलीस निरीक्षक आदींच्या नावाचा उदो उदो करीत, टाळ - वाजंत्री वाजवीत त्यांच्या नावाचा गजर केला. अंबाडी रोड ते वसई रोड स्टेशनच्या मुख्य रस्त्यावरून पोलीस प्रशासनाला देव देवता मानून त्यांच्या प्रतिमेची पालखीद्वारे भव्य मिरवणूक काढली.
यावेळी पालघर पोलिसांच्या विरोधात हाय - हाय च्या घोषणा देत तात्काळ गुन्हा दाखल करा अन्यथा खुर्ची खाली करा अशाही घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. या अनोख्या आंदोलनाविषयी बोलताना ‘मी वसईकर अभियान’चे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी भ्रष्टाचाºयांना पाठिशी घालणारे पालघर पोलीस असा त्यांचा उपहासात्मक उल्लेख केला. या भव्य पालखी मिरवणुकीत ‘मी वसईकर अभियाना’चे अध्यक्ष मिलिंद खानोलकर, जेष्ठ वकील अशोक वर्मा, अनिल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते किसनदेव गुप्ता, माकृस रोजारिओ, रवी सिंग, मुकेश भट, विनायक नाईक, देवेश कुमार, रश्मी राव, लव जॉय डायस, आदी उपस्थित होते.
उपोषण, धरणे करूनही दखल नाही
गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ‘मी वसईकर’च्या कार्यकर्त्यांचे १६ जुलैपासून वसईच्या अप्पर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर लोकशाही मार्गाने उपोषण, धरणे आंदोलन सुरू आहे. याउलट गेल्या आठवड्यात या आंदोलकांचा तंबूच उखडून टाकण्याचा प्रयत्न पोलीस तसेच महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आला होता.