कुटीर रुग्णालयाची डॉक्टर गायब, गेल्या ३ महिन्यांपासून रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 03:48 AM2017-08-27T03:48:43+5:302017-08-27T03:48:55+5:30
- हुसेन मेमन ।
जव्हार : येथील कुटीर रूग्णालयातील डॉक्टर वर्षा भुसे या जून पासून म्हणजेच गेल्या ८५ दिवसांपासून न सांगता रजेवर गेल्यामुळे येथील रूग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. उपचारा करीता थेट ठाणे नाहीतर नाशिक या शहरात जावे लागत आहे.
जव्हार येथे शासकिय रूग्णालयात गेल्या दोन ते तीन वर्षापासून डॉ. भुसे या कार्यकरत होत्या, मात्र त्या रोज कल्याण येथून ११० कि.मी.चा प्रवास करुन जव्हारला सकाळी ११.०० ते ११.३० च्या दरम्यान पोहचत होत्या, त्यानंतर त्यांना लगेचच जाण्याची घाई होत असे, दुपारी २.०० वाजले की जेवण करून त्या थेट बस स्टॉप गाठायच्या, याबाबत शेकडो लेखी व तोंडी तक्रारी वैद्यकीय अधिकाºयांकडे करण्यात आल्या.
वैद्यकिय अधिकाºयांनी सुध्दा त्यांना वेळोवेळी याबाबत समज दिली होती. मात्र त्यांची जव्हार येथे काम करण्याची इच्छाच नव्हती, त्यामुळे वारंवार रूग्णांबरोबर त्यांचे खटके उडायचे, वेळेवर या आणि वेळेवर जा असा आग्रह वरिष्ठांनी धरला तर त्या आजारपणाची सबब सांगायच्या. त्यामुळे गंभीर स्थितीतील रूग्णांना नाशीक, ठाणे, या ठिकाणी जाऊनच उपचार घ्यावे लागायचे अन्य पर्याय नसल्याने नाईलाजास्तव रूग्णही त्यांचे हे वागणे सहन करीत होते. तसेच वैद्यकिय अधिकारीही हे जाणून होते की, जर या डॉक्टर गेल्या तर दुसरे डॉक्टर मिळणे कठीण होईल, यामुळे ते ही फार ताणून धरायचे नाही. परंतु, आता मात्र कळस झाल्याने येथील जनता संतप्त झाली आहे व तिने वैद्यकीय अधिकाºयांना साकडे घातले.
आम्ही डॉ. वर्षा भुसे यांना दोन वेळा ताबडतोब रूजू होण्याकरिता मेमो पाठवलेले आहेत, मात्र त्या आता वैद्यकीय रजेवर गेल्या असून त्यांनी तसेच प्रमाणपत्र पाठविले आहे. याबाबत वरीष्ठ विभागाला कळविण्यात आलेले आहे.
-डॉ. रामदास मराड, वैद्यकिय अधिकारी, जव्हार कुटीर रूग्णालय