प्रशासनाविरोधात नगरसेवकांचेच आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:03 AM2019-09-17T00:03:49+5:302019-09-17T00:03:57+5:30
वाडा नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी शेकडो नागरिकांसोबत प्रशासनाविरोधात सोमवारी नगर पंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
वाडा : नगरपंचायत क्षेत्रातील लाभार्थ्यांचे शौचालय अनुदान, रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या महिलांना कामांचा मोबदला मिळावा यासाठी तसेच रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वाडा नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी शेकडो नागरिकांसोबत प्रशासनाविरोधात सोमवारी नगर पंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
वाडा ग्रामपंचायत कार्यकाळात स्वच्छ भारत योजनेअंतर्गत वाडा नगर पंचायत क्षेत्रातील १०७ लाभार्थ्यांना शौचालये मंजूर होऊन त्यांचे काम पूर्ण करण्यात आले होते. नंतर नगर पंचायत अस्तित्वात येऊन या लाभार्थ्यांचे अनुदान नगर पंचायतीकडे आले असूनही वेळोवेळी मागणी करूनही आजपर्यंत हे अनुदान या लाभार्थ्यांना देण्यात आलेले नाही. वारंवार मागणी करूनही मोहोंड्याचा पाडा येथील सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती करण्यात येत नाही. मार्च २०१९ या महिन्यात सुमारे ८० महिलांना रोजगार हमी योजनेअंतर्गत नगर पंचायतीमार्फत रोजगार देण्यात आला होता. मात्र या कामांचा मोबदलाही नगरपंचायत प्रशासनाने दिलेला नाही.
शहरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. ते तत्काळ भरण्यात यावेत, आदी मागण्यासाठी नगरसेवक रामचंद्र भोईर, अरुण खुलात आणि नगरसेविका ऊर्मिला पाटील यांनी आंदोलन केले.
> नगर पंचायत प्रशासन आम्हा नगरसेवकांना थातूरमातूर उत्तरे देऊन वेळकाढूपणा करत असेल तर नागरिकांनी प्रशासनाकडून काय अपेक्षा करावी? असा प्रश्न निर्माण होतो. जोपर्यंत आमच्या मागण्या संदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.
- रामचंद्र भोईर, नगरसेवक
>पंचायत समिती प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून लवकरच शौचालय अनुदान व कामाचा मोबदला मिळवून दिला जाईल.
- सागर साळुंखे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, वाडा.