नगरसेवक वाढले, परंतु विकास मात्र मंदावला
By admin | Published: October 26, 2015 01:21 AM2015-10-26T01:21:42+5:302015-10-26T01:21:42+5:30
वसई-विरार शहर महानगरपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. यंदा नगरसेवक व प्रभाग समित्यांमध्ये वाढ झाली.
वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. यंदा नगरसेवक व प्रभाग समित्यांमध्ये वाढ झाली. ८९ चे ११५ प्रभाग झाले, तर प्रभाग समित्या ५ च्या ९ झाल्या. परंतु, परिस्थितीत मात्र कोणताही बदल झाला नाही. साफसफाईची कामे वेळेवर होत नसल्यामुळे दुपारी दोन ते अडीचपर्यंत अनेक प्रभाग समित्यांच्या क्षेत्रात कचरा साचलेला दिसतो. साफसफाईच्या कामावर नियुक्त केलेले ठेकेदार ठरवून दिलेले कर्मचारी नेमत नसल्यामुळे साफसफाईची कामे पूर्वलक्षीप्रभावाने होत नाहीत. सदर बाब नवनिर्वाचित आयुक्त सतीश लोखंडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आता कठोर कारवाईस सुरुवात केली आहे.
वसई-विरार उपप्रदेशात महानगरपालिका निर्माण होऊन ६ वर्षांचा कालावधी लोटला आहे. या कालावधीमध्ये प्रामुख्याने रस्ते व गटारे इ. विकासकामे पार पडली. पाणी, आरोग्य, शिक्षण या तीन क्षेत्रांत मात्र भरीव विकासकामे होऊ शकली नाही. वाढत्या लोकसंख्येच्या या क्षेत्राला पूर्णअंशाने पाणीपुरवठा करण्याकरिता अतिरिक्त धरणाची गरज आहे. महानगरपालिकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे, परंतु सुसरी व देहर्जे या दोन्ही पाणीपुरवठा प्रकल्पांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतो.
वसई-विरार शहर महानगरपालिकेला कर्मचारी भरतीकरिता शासनाच्या नगरविकास खात्याने पदमंजुरी दिली आहे. परंतु, अद्याप ही पदे भरण्यास सुरुवात झालेली नाही. महानगरपालिकेत काम करणारा ८५ टक्के कर्मचारी हा ठेक्यावरील कामगार आहे. कुशल व अकुशल कामगार अशी वर्गवारी न करता सरसकट भरती केल्यामुळे त्याचा परिणाम विकासकामांवर होत असतो. शहर साफसफाईची कामे ठेकेदारांकडे सोपवण्यात आली आहेत. परंतु, हे ठेकेदार साफसफाईच्या कामावर ठरवून दिलेल्या संख्येने कामगार लावत नसल्यामुळे साफसफाईच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. प्रशासकीय कामकाजासाठी ठेक्यावरीलच कर्मचारी नियुक्त करण्यात आल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे.