बनावट बीअर विकणारे अटकेत, बूच आणि लेबल बदलून विकत होते भरमसाट किमतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 02:45 AM2018-08-14T02:45:01+5:302018-08-14T02:45:23+5:30
दमण बनावटीची दारू आणि बिअरचे लेबल व बूच बदलून महाराष्ट्रात विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून तीमधील २ जणांना अटक करण्यात ठाणे राज्य उत्पादन शुल्क पथकाला यश आले आहे.
विरार - दमण बनावटीची दारू आणि बिअरचे लेबल व बूच बदलून महाराष्ट्रात विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून तीमधील २ जणांना अटक करण्यात ठाणे राज्य उत्पादन शुल्क पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून १५ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात ३ लाख ३९ हजार ४०० रुपयांची बनावट दारू आहे. गटारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
गुजरात दमण येथून बनावट दारू आणि बिअर महाराष्ट्रात सप्लाय केली जात असल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन शुल्क पथकाला मिळाली होती. ही दारू आणि बियरचे बॉक्स भाजीपाल्याच्या टेम्पोमधून सप्लाय होत होती. ही माहिती पथकाला मिळाल्याच्या नंतर १५ दिवसांपासून त्यांनी पालघर जिल्ह्यातील चारोटी चेकपोस्ट येथे सापळा लावला होता. सोमवारी सकाळी टेम्पोची चारोटी नाक्यावर झडती घेतली असता त्यात भाजीपाला आढळून आला पण त्याच्या आत पुन्हा झडती घेतली असता या पथकाला दमणच्या बनावट दारु आणि बियरचे १०५ बॉक्स आढळून आले. ही दारु हायवेच्या बाजूला विरार फाट्यावर उतरवून घेऊन बाटल्यांचे मूळ लेबल व बूच काढून त्याऐवजी महाराष्ट्रात वैध ठरणारे लेबल व बूच लावून त्याची विक्री केल्याची कबुली आरोपीने दिली आहे . यापूर्वी विदेशी बनावट मद्य तयार करताना खूप जणांना पकडले आहे. परंतु बियरच्या बाटलीचे बूच बदलून त्या विकण्याचा प्रकार प्रथमच उघडकीस आला आहे.
विरार येथे गोदामात चालत होता हा गोरखधंदा
दमण येथील दारू आणि बिअर आल्यानंतर त्यावरील बूच व लेबल हे विरार मधील एका गोदामात बदलले जात होते. ते कसे बदलतात याचे प्रात्यक्षिक आरोपीने आणि अधिकाºयांना दाखविले आहे. ही बनावट दारू ओळखली जाऊ नये यासाठी हे केले जात होते. नंतर ती बिअर शॉप, परिमट रूम यांना उच्या किंमतीला विकली जात असल्याचेही तपासात उघड झाले आहे. पण ही दुकाने, बार, परमीट रुम कोणत्या याचा तपासही आता केला जाणार आहे.
बाटलीमागे ७० ते १०० रुपये
८० बॉक्स किंगफिशर बीअर चे व २५ बॉक्स विदेशी मद्य असे एकूण १०५ बॉक्स मध्ये हि बनवट दारू पोलिसांना मिळाली आहे. आरोपीने पोलिसांना गोडावून दाखवले, त्यात पोलिसांना एक मशीन मिळाली. तिचा वापर करून दमण च्या दारूचे लेबल व बूच काढून त्याऐवजी तिच्यावर महाराष्ट्रातील ब्रँड व किंमतीचे लेबल लावयचे काम ही टोळी करत होती. या गोरख धंद्यातून त्यांना प्रचंड नफा मिळत होता. या टोळीचा शोध आता कसून घेतला जात आहे.
एका बॉटल मागे ७० ते १०० रुपये फायदा हे आरोपी करून घेत होते. हे फार मोठे रॅकेट असून महाराष्ट्राच्या महसूलाचे खूप मोठे नुकसान होत असल्याचे सुभाष जाधव (निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे) यांनी सांगितले. या मध्ये ज्यांची नावे समोर आली आहेत त्यांचा तपास सुरु आहे. तर ही दारू कोणत्या दुकानात विकली जात होती याचा तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.