माकप विरुद्ध शिवसेनेच्या आमदारांचा रंगला कबड्डी सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 05:19 AM2019-12-05T05:19:29+5:302019-12-05T05:19:44+5:30
दोघांनीही अभिनिवेश बाजूला ठेवत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.
- अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी: डहाणू पंचायत समिती शिक्षण विभागाच्या तालुकास्तरीय जिल्हा परिषदेच्या शालेय क्रीडा स्पर्धत बुधवार, 4 डिसेंबर रोजी चंद्रनगर केंद्रशाळेच्या मैदानावर डहाणू विधानसभेचे माकपचे आमदार विनोद निकोले आणि पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्यात रंगलेला कबड्डीचा सामना जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
चौदाव्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित डहाणू विधानसभेचे माकपचे आमदार विनोद निकोले आणि पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा हे दोघे डहाणू पंचायत समिती शिक्षण विभागाच्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेकरिता सदिच्छा भेट द्यायला दुपारच्या सुमारास चंद्रनगर शाळेच्या पटांगणावर आले होते. या दोन्ही आदिवासी आमदारांनी शालेयवयात कबड्डीचे धडे घेतले आहेत. आज जेव्हा शालेय विद्यार्थ्यांचे संघ आमने-सामने आल्यावर त्यांना जुने दिवस आठवले.
दोघांनीही अभिनिवेश बाजूला ठेवत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. आमदार निकोले यांनी बोर्डी गटातील मुलांच्या कबड्डी संघाचे तर आमदार श्रीनिवास वनगा यांनी गंजाड संघाचे नेतृत्व करीत मैदानावर हजेरी लावताच, उपस्थितां मध्ये एकच जल्लोष सुरू झाला. निकोले यांनी चढाई करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वनगा यांनी निकोले यांना चक्रव्यूहात अडकविण्याचा केलेला शर्थीचा प्रयत्न केवळ सहकारी खेळाडूंची साथ न लाभल्याने अयशस्वी राहिल्याने निकोले यांची चढाई यशस्वी ठरली.
दरम्यान दोन्ही आमदारांच्या खेळाडूवृत्तीचे उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि अन्य मान्यवरांनी कौतुक केले. तर या सामन्याचे व्हिडीओ सोशलमीडियावर फिरू लागल्यावर नेटकाऱ्यांचीही त्याला पसंती मिळाली.