तारापूर एमआयडीसी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 02:03 AM2020-11-28T02:03:09+5:302020-11-28T02:03:25+5:30
तोडलेली बांधकामे काही दिवसांनी पूर्ववत होत असल्याचा आरोप
बोईसर : तारापूर एमआयडीसीतील काही अनधिकृत बांधकामे व शेड शुक्रवारी तोडण्यात आल्या. मात्र, अशा प्रकारे अनेक अनधिकृत बांधकामांवर ठोस कारवाई कधी होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आज तोडलेले बांधकाम काही दिवसांनी पूर्ववत होत असल्याने तोडक कारवाई ही एक फार्स ठरत असल्याचे बोलले जात आहे.
तारापूर एमआयडीसी क्षेत्रात शेकडो अनधिकृत बांधकामे सध्या दिमाखात उभी असून वर्षातून कधीतरी होणारी कारवाई ही दिखाऊ ठरत असल्याची टीका केली जात आहे. इतर अनधिकृत बांधकामांकडे मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचाही आरोप होत आहे. शुक्रवारी फक्त तीन ढाब्यांच्या शेड तोडण्यात आल्याने या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असून कारवाईपूर्वी तीनही ढाब्यांचे पत्रे ढाबाचालकांनीच खाली उतरवले होते. तर, कारवाईत दुजाभाव केल्याचा आरोप काहींनी केला.
दरम्यान, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई हाती घेण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तारापूरचे उपकार्यकारी अभियंता संदीप बडगे यांनी दिली.